No products in the cart.
केदार आणि चित्रकार !
ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईतल्या दोन सर्वात जुन्या कला संस्थांच्या कार्यकारिणीवर मी काम करत असे. त्यातली एक होती बॉम्बे आर्ट सोसायटी तर दुसरी होती आर्टिस्ट सेंटर. आर्टिस्ट सेंटरचा तर मी सहसचिव होतो. चित्रकार आरा यांच्या निधनानंतर आर्टिस्ट सेंटरला अतिशय वाईट अवस्था आली होती. जवळ जवळ सर्वत्र वाळवीचंच साम्राज्य पसरलं होतं. तेव्हा तरुण होतो त्यामुळे सतत काहीतरी करावंसं वाटत असे.
त्याच भरात प्रख्यात कला समीक्षक, लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी नामवंत उपयोजित चित्रकार यशवंत चौधरी, चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर आणि ‘मार्ग’च्या संपादिका डॉ सरयू दोशी अशा दिग्गजांना आर्टिस्ट सेंटरमध्ये आमंत्रित करुन माझ्या भोवती जमलेल्या अनेक तरुण कलावंतांच्या सहकार्यानं मी आर्टिस्ट सेंटरला पुन्हा नवं स्वरुप प्राप्त करुन दिलं होतं.
मला आठवतंय तिथले वाळवीचे किडे आम्ही तरुण मुलांनी हातांनी उचलून बाहेर फेकले होते / नष्ट केले होते. तिथं अनेक कलावंत आपली चित्रं सोडून गेले होते. पत्रावर पत्र पाठवूनही कुणी ते नेईनात तेव्हा प्रफुल्ला बाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती सर्व चित्र विकून टाकली. तेव्हा काही आजच्या सारखा चित्रांना प्रचंड भाव मिळत नव्हता. पण जी काही रक्कम संस्थेच्या हाती आली तिचा वापर करुन आम्ही आर्टिस्ट सेंटरच्या गॅलरीला अत्याधुनिक स्वरूप प्राप्त करून दिलं.
मला आठवतंय तिथले वाळवीचे किडे आम्ही तरुण मुलांनी हातांनी उचलून बाहेर फेकले होते / नष्ट केले होते. तिथं अनेक कलावंत आपली चित्रं सोडून गेले होते. पत्रावर पत्र पाठवूनही कुणी ते नेईनात तेव्हा प्रफुल्ला बाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती सर्व चित्र विकून टाकली. तेव्हा काही आजच्या सारखा चित्रांना प्रचंड भाव मिळत नव्हता. पण जी काही रक्कम संस्थेच्या हाती आली तिचा वापर करुन आम्ही आर्टिस्ट सेंटरच्या गॅलरीला अत्याधुनिक स्वरूप प्राप्त करून दिलं.
त्यावेळी आम्ही अनेक चित्रकला स्पर्धा घेतल्या, अनेक व्याख्यानं आयोजित केली, रझा, सुझा, गाडे यांच्या सारख्या श्रेष्ठ कलावंतांच्या जाहीर मुलाखतींचे कार्यक्रम देखील आयोजित केले. प्रभाकर बरवे यांच्या कोरा कॅनव्हास या पुस्तकाचं प्रकाशन देखील आम्ही तिथंच आयोजित केलं होतं.
वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम व्हायला हवेत म्हणून शास्त्रीय संगीताच्या मैफली देखील आम्ही तिथं आयोजित केल्या. त्या आयोजित करण्याची जबाबदारी अर्थातच माझा चित्रकार मित्र माधव इमारते यानं घेतली होती. त्यातला त्यानं आयोजित केलेला पहिला कार्यक्रम होता तरुण गायक केदार बोडस याच्या गायनाचा. जवळ जवळ छत्तीस – सदतीस वर्ष लोटली आहेत तो कार्यक्रम झाल्याला. पण आजही केदारचे सूर आठवतात. खूप रंगला होता तो कार्यक्रम.
मंगळवारच्या वृत्तपत्रात त्याच्या निधनाची बातमी वाचून अक्षरशः धक्काच बसला. माधवला तातडीनं फोन केला तर तो पुण्याला जाऊन आला होता. आणि काहीसा त्या धक्क्यातच तो होता. स्टोअर रुममधल्या जुन्या फोटोंच्या अल्बमला सहज म्हणून हात घातला तर केदारच्या त्या कार्यक्रमाचाच फोटो हाताशी आला.
एकोणसाठ – साठ हे काही कलावंतांच्या जाण्याचं वय नसतं. खरं तर इथूनच त्याच्या आयुष्यातलं नवं पर्व सुरु होतं. प्रसिद्धी, मानमरातब, पुरस्कार सारं काही याचं काळात त्याच्या जवळ येतं. नेमक्या अशाच काळात संगीताला सर्वस्व वाहून टाकलेल्या पं केदार बोडस यांचं अकाली निधन व्हावं ही गोष्ट अतिशय चटका लावून गेली.
*******
– सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion