News

कोकणातलं अनुकरणीय चित्रप्रदर्शन!

रत्नागिरी, १८ डिसेंबर

 

चित्रकार शशिकांत बने यांच्या चित्रांचं एक प्रदर्शन दि. १७ डिसेंबरपासून देवरुखच्या ‘देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन’च्या कलादालनात भरले आहे. भारतात आजवर ५० पेक्षा अधिक कलाप्रदर्शन भरवलेल्या चित्रकार बने यांनी ज्या गावात आपण जन्मलो, लहानाचे मोठे झालो, त्या गावातल्या नागरिकांनादेखील आपल्या कलेचा लाभ घेता यावा, चित्र पाहण्याचा आनंद आणि अनुभवदेखील त्यांना लुटता यावा या हेतूनं श्री बने यांनी हा अभिनव उपक्रम आखला आहे. शशिकांत बने यांचे जवळचे मित्र म्हणजे चित्रकार फिलिप डिमेलो. दोन्ही मित्रांनी आयुष्यभर मुंबई महानगर पालिकेच्या शाळेमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून नोकरी केली. अनेक विद्यार्थी घडवले. स्वतःच्या चित्रांची अनेक प्रदर्शनं भरवली. देशपरदेशात प्रवास केला. आणि सेवानिवृत्तीनंतर कला साधनेकडे पूर्ण लक्ष पुरवलंच, पण वेगवेगळ्या उपक्रमांना जन्मदेखील दिला.

फिलिप डिमेलो यांनी गतवर्षी वसईत नाताळनंतर लगेचच परिसरातल्या कलावंतांचं संमेलन भरवलं होतं. अतिशय हृद्य असा उपक्रम होता तो. यंदाही नाताळानंतर त्यांनी तो उपक्रम भरवण्याचं निश्चित केलं आहे. डिमेलोंचा तोच कित्ता त्यांच्या जिवलग मित्रानं म्हणजे शशी बने यांनी भरवला नसता तर ते नवलच ठरलं असतं. त्यांनी तर या वर्षी थेट देवरुखमधल्या आपल्या मूळ गावातच प्रदर्शन भरवून कला प्रसाराचा एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. या उभयतांकडून स्फूर्ती घेऊन महाराष्ट्रातल्या अन्य चित्रकारांनी आपापल्या गावात परिसरात कलाप्रसाराचं कार्य सुरु केलं तर निश्चितपणे चित्रकला प्रसाराबाबतची एका मोठी कोंडी निश्चितपणे फोडली जाईल.

शशिकांत बने यांचं हे प्रदर्शन ४ जानेवारीपर्यंत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्तानं चित्रकार अनिल नाईक (दि. २१ डिसेंबर) आणि रवी मंडलिक (२३ जानेवारी रोजी) यांच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रमदेखील श्री बने यांनी आयोजित केला आहे. याशिवाय बालचित्रकला स्पर्धा आणि चर्चासत्राचा कार्यक्रमदेखील श्री बने यांनी आयोजित केला आहे. श्री बने यांचा हा उपक्रम अतिशय उल्लेखनीय आणि अनुकरणीय आहे यात शंकाच नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी कृपया ९६३७१३९८६० या नंबरवर संपर्क साधावा.

पत्ता: देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, भागवत संकुल, मु पो देवरुख, ता. संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.