No products in the cart.
ललिता लाजमी यांचे निधन
ज्येष्ठ स्त्री चित्रकार ललिता लाजमी यांचे निधन झाले. चित्रपट दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या त्या भगिनी होत्या. 17 ऑक्टोबर 1932 रोजी जन्मलेल्या ललिता लाजमी यांचा जन्म कलकत्त्यास झाला. बालपण मुंबईत गेले व शालेय शिक्षण दादरच्या किंग जॉर्ज हायस्कूलमध्ये झाले. मॅट्रिक होताच त्यांचा मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी करणाऱ्या गोपाळकृष्ण लाजमी यांच्याशी विवाह झाला. तत्पूर्वी काही काळ त्यांनी गजानन हळदणकर आणि एम.आर. आचरेकर यांच्याकडे चित्रकलेचे धडे गिरवले. परंतु त्या अकॅडमिक पद्धतीच्या चित्रात रमल्या नाहीत.
लग्न होऊन कुलाबा येथे राहण्यास आल्यावर त्यांनी रेखाटन व निसर्ग चित्रण करण्यास सुरुवात केली. या काळात त्यांचा के. एच. आरा यांच्याशी परिचय झाला. आरा यांच्या प्रोत्साहनाने ललितांनी 1961 मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीत पहिले प्रदर्शन केले. यानंतर त्या मुद्रा चित्र शिकण्यासाठी जेजेत सायंकालीन वर्गात येऊ लागल्या. या काळात त्यांनी आर्ट मास्टर ही पदविका संपादन केली. दरम्यानच्या काळात त्यांचे पती आजारी झाले व आर्थिक चणचण भासू लागली. त्यामुळे त्यांनी दोन शाळांमध्ये अर्धवेळ चित्रकला शिक्षक म्हणून नोकरी केली.
ललिता लाजमीनीं अमोल पालेकर यांच्या नाटकांसाठी वेशभूषा आणि विविध प्रकारचे मुखवटे बनवले. यातूनच त्यांच्या व्यक्तिप्रधान चित्रांना चालना मिळाली. चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या अस्तित्व ग्रुप मध्ये त्या सहभागी होऊ लागल्या. त्यात होणाऱ्या चर्चांनी ललिता लक्ष्मी यांच्या कलाविषयक जाणीव प्रकल्प होत गेल्या. सातत्याने चित्र निर्मिती करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
आयुष्याच्या अखेरपर्यंत ललिता लाजमीनीं त्यांच्या शैलीत विविध प्रयोग करत मानवी जीवनाचे विविध पैलू रंगवत राहिल्या. सध्या त्यांच नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे सिंहावलोकनी प्रदर्शन चालू असतानाच त्या हे जग सोडून गेल्या. ललिता लाजमी यांच्या निधनाने एक भारतीय समकालीन चित्रकार आपणास सोडून गेली.
ललिता लाजमी यांना श्रद्धांजली.
*****
Related
Please login to join discussion