No products in the cart.
प्रभाकर कोलते यांना जीवनगौरव पुरस्कार
जळगाव येथील भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशनचा ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार‘ यंदा नामवंत चित्रकार प्रभाकर कोलते यांना जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या जैन उद्योग समूहाच्या सेवाभावी संस्थेकडून देण्यात येणाऱ्या द्विवार्षिक पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रभाकर कोलते यांनी जे.जे. कला महाविद्यालयात शिक्षण घेतले त्यानंतर १९७२ ते १९९४ ही बावीस वर्ष त्यांनी जे.जे.मध्ये अध्यापन केले. विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक आणि अनेक तरुण चित्रकारांना प्रेरणा देणारे चित्रकार म्हणून ते ओळखले जातात. भारतीय अमूर्त चित्रकलेतील समकालिन चित्रकारांमध्ये कोलते यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. अमूर्त चित्रकलेमध्ये कार्यरत असलेल्या अनेक चित्रकारांवर त्यांचा प्रभाव दिसून येतो. संत परंपरेचा अभ्यास करून अमूर्तातील अध्यात्म उलगडून दाखवणारे चिंतनशील चित्रकार म्हणूनही ते ओळखले जातात.
कलाविषयक लेखन हा कोलते यांच्यातील कलाशिक्षकाचाच एक वेगळा पैलू आहे. स्वत:च्या चित्रप्रक्रियेबरोबरच इतर समकालीन चित्रकारांच्या चित्रांविषयी त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. अमूर्त चित्रांचा आस्वाद कसा घ्यावा बद्दलही त्यानी वेळोवेळी लिखाण केले. त्यामुळे अमूर्त चित्रे आणि रसिक यांच्यातील अंतर काही प्रमाणात कमी झाले असे म्हटल जाते. दृकचिंतन हे त्यांनी लिहिलेले पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे.
कोलते यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक (१९७०) आणि राज्य कला पुरस्काराने (१९७१-७२) सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांना १९७८ मध्ये इंडो-जर्मन कल्चरल सोसायटीचा ‘डॉ. लँगहॅमर’ पुरस्कार प्राप्त झाला. दृक्कलेतील विशेष योगदानासाठी त्यांना २०१० मध्ये ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’च्या ‘जनस्थान’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
Related
Please login to join discussion