No products in the cart.
वेरूळ येथे किरणोत्सव सांगता
वेरूळ ही जागतिक वारसा असलेली महत्वाची युनेस्को हेरिटेज साईट आहे. बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माच्या विविध एकूण ३४ लेण्या वेरूळमध्ये आहेत. दरवर्षी १० ते १२ मार्च या काळात येथे किरणोत्सव साजरा होतो. वेरुळ येथील लेणी क्र.१० मधील चैत्यगृहात तथागत बुद्धाची भव्य मूर्ती आहे. यातील बुद्धमूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव आणि लेणी परिसरातील वातावरण मनःशांती देणारे आहे. लेणी क्र १० मध्ये १० ते १२ मार्च दरम्यान रोज संध्याकाळी ४.३० ते ५.१५ दरम्यान चैत्यगृहाच्या समोरील झरोक्यातून सूर्याची किरणे भगवान बुद्धाच्या चेहऱ्यावर येऊन बुद्धाचा चेहरा प्रकाशमान करतात. पर्यटक, अभ्यासक यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असते.
या किरणोत्सवाबद्दल औरंगाबाद येथील प्रा. अश्विन जोगदंड यांना अधिक माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, “प्राचीन काळातील स्थापत्य विशारदांना खगोलशास्त्राचे परिपूर्ण ज्ञान असल्याचा पुरावा प्रत्येक लेणीतून दिसून येतो. पण या खगोलशास्त्रीय अद्भुत आविष्काराचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची व्यवस्था त्या अनामिक स्थापत्य विशारदांनी आपल्यासाठी आजही करून ठेवली आहे.” उत्तरयानातील किरणोत्सव वर्षातून एकदाच आपल्याला पाहायला मिळतो. एकप्रकारे ही एका तेजाची दुसऱ्या तेजाशी भेटच आहे.”
*****
बातमीतील सर्व फोटो आणि व्हिडीओ प्रा. अश्विन जोगदंड यांच्या सौजन्याने.
Related
Please login to join discussion