News

फौंडेशनला फक्त १३०० विद्यार्थी !

एक अतिशय धक्कादायक बातमी आज हाती आली आहे. यंदाच्या फौंडेशनच्या परीक्षेला फक्त १३०० च विद्यार्थी बसणार आहेत. गतवर्षी देखील १३०० विद्यार्थीच बसले होते. कोणे एके काळी या परीक्षांना सात – सात, आठ – आठ हजार विद्यार्थी बसत असत. हळूहळू ती संख्या कमी होत गेली आणि आता ती १३०० वर येऊन ठेपली आहे.
फौंडेशन कोर्स हा ७० च्या दशकात सुरु झाला. सुमारे वीस अनुदानित कला महाविद्यालयातून १९९४ सालापर्यंत उत्तम पद्धतीचं शिक्षण दिलं जात होतं. आज वेगवेगळ्या क्षेत्रात जे चित्रकार, कला दिग्दर्शक वगैरे नावं कमावून आहेत ते याच अभ्यासक्रमाचे विद्यार्थी होत. पण १९९४ साली कला संचालकपदावर पुण्यातून मुरलीधर नांगरे नामक गृहस्थ विराजमान झाले आणि नंतरच्या वर्षा दोन वर्षातच महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यात सुलभ शौचालयाप्रमाणे थोडी थोडकी नाही तर जवळ जवळ २०० विनाअनुदानित कला महाविद्यालयं सुरु झाली आणि कोणे एके काळी कला शिक्षणाच्या बाबतीत भारतात सर्वोच्च स्थानी असलेल्या कला संचालनालयाला अवकळा येण्यास सुरुवात झाली. कारण ही सारीच्या सारी महाविद्यालयं भ्रष्टाचारातून निर्माण झाली होती.
या काळात उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपद भूषविलेल्या मतिमंद वृत्तीच्या मंत्र्यांनी कला संचालनालयाकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. आणि चित्रकलेशी काडीचाही संबंध नसलेली मूर्ख माणसं आणि वशिल्याच्या तट्टू प्रभारी संचालक पदी नेमली गेली. त्यांनी १९६० च्या दशकापासून सर्वश्री आडारकर, धोंड, सातवळेकर आणि सडवेलकर इत्यादींनी मोठ्या मेहनतीनं बसवलेली कला संचालनालयाची घडी विस्कटून टाकली. या काळात कला संचालनालय  भ्रष्टाचाराची अक्षरशः बजबजपुरी झालं.
बहुसंख्य विनाअनुदानित महाविद्यालयात काल डिप्लोमा घेतलेली मुलं आज शिक्षक होतात आणि उद्या प्राचार्य होतात असली भयानक परिस्थिती असल्यामुळं शाळेचा वर्ग, घराची ओसरी किंवा पडवी, दुकानाचा गाळा, देवळाचा सभा मंडप , चावडी, पत्र्याच्या शेड्स या मध्ये भरवली गेलेली ही कला महाविद्यालयं हळूहळू बंद पडत गेली. आता त्यातली किती सुरु आहेत आणि किती बंद झाली हे दस्तुरखुद्द कला संचालक देखील सांगू शकत नाहीत. इतकी भयानक परिस्थिती आहे.
त्यामुळंच एकेकाळी नऊ ते दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या कला महाविद्यालयातून आता जेमतेम चार एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगितले जाते. फौंडेशन कोर्स हा या शिक्षण प्रणालीचा पाय होता. पण तिथंच यंदा १३०० विद्यार्थी परीक्षा देत असल्यामुळं या डिप्लोमा शिकवणाऱ्या कॉलेजेसचं भवितव्य संपूर्णपणे धोक्यात आलं आहे.
पुढल्या वर्षी सुरु होणाऱ्या नव्या शिक्षण प्रणालीत दहावी आणि डिप्लोमा कोर्सेसना कुठलंही स्थान नसल्यामुळं महाराष्ट्रातली सर्वच्या सर्व कला महाविद्यालय बंद पडली तरी आश्चर्य वाटणार नाही. या अशा कला महाविद्यालयातील शिक्षकांना आज शासन ९० % ग्रँट देते ( आणि त्यावर देखील शासकीय अधिकारी कसा डल्ला मारतात त्याच चित्रण आजच आम्ही प्रसिद्ध केलं आहे. ते अवश्य वाचा. ) ‘चिन्ह’नं सातत्याने आपल्या युट्युब चॅनेलवर कलाशिक्षणतज्ञ शिरीष मिठबावकर यांच्या सहकार्याने चर्चा घडवून आणून या क्षेत्रात जागृती आणण्याचा प्रयत्न केला. पण भ्रष्टाचारानं हे क्षेत्र संपूर्ण गिळंकृत केलेलं असल्यामुळं परिस्थिती जशीच्या तशी राहिली आहे. या क्षेत्रातले सारेच लोक इतके हतबल झाले आहेत की, ते आपापल्या व्हाट्सअप ग्रुपवर देखील व्यक्त होताना दिसत नाहीत. ज्यांनी महाराष्ट्राच्या कला शिक्षणाचा सर्वनाश केला त्यांचा त्यांच्या एवढ्या मोठ्या कामगिरीबद्दल मतिमंद मंत्र्यांकडून सत्कार करावा अशी सूचना एका कडवट शिक्षकाकडून आली असल्याचे कळते.
हा मजकूर फाईल करत असतानाच आणखीन एक बातमी आली आहे. त्या बातमीनुसार फौंडेशन कोर्स नव्हे तर आर्ट टीचर डिप्लोमाला देखील यंदा १२०० च विद्यार्थी बसले आहेत. किती भयंकर आहे ही गोष्ट ! आणि माजी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत चालले होते राज्यस्तरीय विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी.  वारे शिक्षणमंत्री !
*****
– सतीश नाईक,
संपादक, चिन्ह

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.