No products in the cart.
मंगेश काळे यांना पुरस्कार…
चित्रकार आणि लेखक मंगेश नारायणराव काळे यांना चित्रकलेतील गुणवत्तापूर्ण योगदानासाठी राजारामबापू पाटील ललित कला अकादमीतर्फे राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला सन्मान जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. माजी मंत्री आमदार जयंत पाटील हे या पुरस्काराचे संस्थापक – अध्यक्ष आहेत.
या पुरस्कारासाठी प्रामुख्याने काळे यांच्या ‘चित्रसंहिता’ या पुस्तकाचा आणि चित्रकलेतील कारकीर्दीचा प्रामुख्याने विचार झाला आहे. काळे लिखित ‘चित्रसंहिता’ हे चित्रकलेचा इतिहास, कलेची भाषा आणि समकालीन चित्रकला यांचा उहापोह करणारे एक मार्गदर्शक पुस्तक आहे. विशेषतः चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक पथदर्शक आहे. प्रकाशनापासूनच हे पुस्तक लोकप्रिय ठरले आणि या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या प्रकशित झाल्या आहेत.
काळे यांच्या मते, मराठी कलाविश्वात दृश्यकलेची मूलभूत मांडणी करणारे लेखन फार कमी झाले आहे. जे काही लेखन झाले ते चरित्र लेखनाच्या अंगानेच झाले आहे. द. ग. गोडसे यांच्यासारखे लेखक सोडले तर चित्रकलेचा मूलभूत विचार आणि मांडणी लेखनातून फार कमी झाली आहे. ‘चित्रसंहिता’ या पुस्तकाच्या लेखनातून मी दृश्यकलेचा मूलभूत विचार माझ्या चिंतनातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वाचक, रसिकांनी या पुस्तकाला पसंती दिलीच आहे पण या पुरस्काराने पुस्तकाचे आणि एकूण मी केलेल्या चित्रकलेतील वाटचालीचे योगदान अधोरेखित झाले याचा मला आनंद आहे.
काळे यांनी ‘चिन्ह’शी बोलताना माहिती दिली की, ‘चित्रसंहिता’ या पुस्तकाची तिसरी आवृत्ती मार्च महिन्यात येत आहे. आगामी काळात इंग्रजी भाषेतही ‘चित्रसंहिता’ या पुस्तकाचा अनुवाद येणार असून तो रंगीत असेल.
‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी मंगेश काळे यांच्याशी ‘गच्चीवरील गप्पा’ या युट्युब कार्यक्रमात संवाद साधला होता. खालील यु ट्युब थंबनेलवर क्लिक करुन हा कार्यक्रम वाचकांना बघता येईल.
******
Related
Please login to join discussion