No products in the cart.
शासकीय कला महाविद्यालय : आंदोलन मागे
काल सकाळपासून सुरु असलेल्या संभाजीनगरच्या शासकीय कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संध्याकाळी उशिरा मोर्चा मागे घेतला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे पत्र डीन प्रा. वडजे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या मागण्या कधीपर्यंत पूर्ण होणार याची तारीखही या पत्रावर नमूद करण्यात आली आहे. दिलेल्या तारखेमध्ये जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर विद्यार्थी पुन्हा आंदोलन करतील असा इशारा विद्यार्थी प्रतिनिधींनी दिला आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असल्याने महाविद्यालयातर्फे सुरक्षेची योग्य व्यवस्था करण्यात येईल अशी हमीही या पत्रामधून घेण्यात आली आहे.
खरं तर विद्यार्थ्यांच्या मागण्या या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. आणि समस्या या आजच्या नाहीत. जे काम वर्षानुवर्षात झालं नाही ते हमी दिल्याप्रमाणे कॉलेज प्रशासन एक – दोन महिन्याच्या अवधीत कसं करणार हा प्रश्नच आहे. पण या आंदोलनानंतर तरी काही चांगल्या गोष्टी घडतील अशी अपेक्षा कला वर्तुळातून व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि त्यांची पूर्तता यासाठी देण्यात आलेल्या अंतिम तारखा पुढील प्रमाणे
१. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करून देणे –
२. महाविद्यालयातील बंद टॉयलेट्स सुरु करून देणे – ३० मार्च २०२३
३. महाविद्यालयाच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नेमून देणे – २८ मार्च २०२३
४. वस्त्रकला आणि इतर विभागासाठी अद्ययावत शिक्षण सुविधा आणि विविध सॉफ्टवेअर उपलब्ध करून देणे. – २८ मे २०२३
५. वस्त्रकला विभागाच्या इमारतीमध्ये टॉयलेट उपलब्ध करून देणे. – २८ एप्रिल २०२३
६. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखती आयोजित करणे. – या शैक्षणिक वर्षांपासून.
७. संपूर्ण महाविद्यालयाच्या खिडक्यांना काचा बसवण्यात येणे – २८ एप्रिल २०२३
८. विद्यार्थ्यांना असलेले अधिकार याविषयीचे फलक कार्यालयाबाहेर लावणे – ३० मार्च २०२३
९. वस्त्रकला विभागाच्या वीणकाम मशीनचे दुरुस्तीकरण करणे – १० एप्रिल २०२३
आता या मागण्या दिलेल्या तारखेला पूर्ण होणार का ? या प्रतीक्षेत कला वर्तुळ आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
****
Related
Please login to join discussion