No products in the cart.
डी-नोव्हो का राज्यस्तरीय विद्यापीठ ?
सर जे जे स्कूल ऑफ आर्ट, सर जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट आणि सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या तीन महाविद्यालयांचं मिळून राज्यस्तरीय विद्यापीठ करण्यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागानं एक समिती स्थापन केली आहे. ही समिती या तिन्ही क्षेत्रातील जाणकारांच्या प्रतिक्रियांची नोंद घेत आहे. आज दि. २० मे २०२२ रोजी मुंबई विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिल रूममध्ये यासंदर्भात मुंबईतील चित्रकारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
सर्वश्री आशुतोष आपटे, गुरुनाथ भडेकर, स्मिता गीध, जहीर मिर्झा, सुनील नाईक, शशांक तेरे, उत्तम पाचारणे, महेंद्र दामले, नितीन केणी, आर्किटेक्ट प्रेमनाथ, ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक इत्यादी नामवंत या सभेस उपस्थित होते. तर डॉ. दीपक कन्नल हे बडोद्यावरून ऑनलाईन उपस्थित होते. या सभेचे अध्यक्षस्थान मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू विलास खोले यांनी भूषवलं तर डॉ. नरेश चंद्र, माजी प्र कुलगुरू, मुंबई विद्यापीठ तसेच डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरू, मुंबई विद्यापीठ आणि चित्रकार सुहास बहुळकर, प्रकाश राजेशिर्के, सेवानिवृत्त उपसचिव शे. व. चिंधडे हे समिती सदस्य देखील या सभेस उपस्थित होते. तर प्रख्यात आर्किटेक्ट शशी प्रभू हे ऑनलाईन उपस्थित होते. प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी ही सभा आयोजित केली होती.
या सभेत उपस्थित असलेल्या बहुसंख्य चित्रकार, शिल्पकार आणि उपयोजित कलाकार तसेच आर्किटेक्ट यांनी डी-नोव्होच्याच बाजूने मतप्रदर्शन केल्याचे कळते. ‘ही सभा आधी व्हायला पाहिजे होती म्हणजे निर्णय घ्यायला वेळ लागला नसता’, अशी एक प्रतिक्रिया उपस्थितांपैकी एका नामवंतानं केल्याचे ऐकू आले. ही समिती आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाला आपला अहवाल देणार आहे. त्या अहवालावरून जेजेच्या डी-नोव्होचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे या समितीच्या अहवालाकडे कलाक्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे.
Related
Please login to join discussion