No products in the cart.
जेजे : मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत सभा बोलावली…
जे जे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सायंकाळी मंत्रालयातल्या आपल्या कक्षात जे जे स्कूल ऑफ आर्ट अनन्य अभिमत विद्यापीठाच्या संदर्भात एक विशेष सभा बोलावली होती. सुमारे एक तासापेक्षा अधिक काळ चाललेल्या या सभेत अनन्य अभि मत विद्यापीठ तसेच राज्यस्तरीय विद्यापीठ यासंदर्भातच विशेष चर्चा झाली . या सभेला सर्वश्री उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार अनिल देसाई, उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,उपसचिव सतीश तिडके, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा,जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड प्रभारी अधिष्ठाता संतोष क्षीरसागर ( जेजे स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे हे मात्र या सभेला अनुपस्थित दिसले ) तसेच मंत्रालयातील उच्च शिक्षण खात्याचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या सभेला जेजे स्कूल ऑफ आर्टच्या प्रमुख माजी विद्यार्थ्यांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं. निमंत्रितांत सहभागी होते सर्वश्री उपयोजित चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील नाईक, फोटोग्राफर पद्मश्री सुधारक ओलवे, उपयोजित चित्रकार भूपाल रामनाथकर व गोपी कुकडे आणि या आंदोलनाचे प्रमुख सूत्रधार आशुतोष आपटे व ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक. काहीशी वादळी पण तरीही खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या सभेत अनेक मुद्द्यांची चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी देखील ही सभा ‘सकारात्मक निर्णय घेण्यासाठी लवकरच पंधरा एक दिवसात पुन्हा भेटू’ या मुद्द्यावर संपवली. या सभेचा विशेष वृत्तांत वाचा उद्या सकाळी विशेष लेखात.
Related
Please login to join discussion