No products in the cart.
एका (न)चित्रकाराचे मनोगत
चित्रकार म्हणून मी सतत वाचत असतो. चित्रकला वर्तुळात काय काय घडामोडी घडतात याकडे माझे बारीक लक्ष असते. त्यातून अनेक विरोधाभास माझ्या समोर येतात. विशेषतः कला समीक्षा आणि कला विक्री क्षेत्रात जे प्रचंड विरोधाभास आहेत त्यामुळे खरा कलाकार मागे पडतो. केवळ आपल्या लफ्फेदार इंग्रजीमुळे आपण कुणीतरी ‘ग्रेट आर्टिस्ट आहोत’ असे भासवणारी कितीतरी सामान्य व्यक्तित्व आज लंडन, पॅरिसची कलावर्तुळे गाजवतात ही खरी परिस्थिती आहे. कला समीक्षा तर अगम्य अशी लांब वाक्ये, रोजच्या वापरात नसलेले इंग्रजी शब्द वापरून बोजड बनवली आहे कित्येक वर्ष! आणि या आशा समीक्षेने मराठी कलाकाराला कित्येक वर्ष घाबरवले आहे. त्यामुळे दर्जेदार मराठी कलाकार उच्चभ्रू कला क्षेत्रात स्थान मिळवू शकले नाहीत. अर्थात याला सन्माननीय अपवाद आहेतच.
ही अगम्य समीक्षा, स्वतः कलाकार म्हणवून घेणारे भुरटे कशाप्रकारे आपल्या कलेबद्दल लिहितील याचा हा नमुना मी आज तयार केला आहे. खरं तर गम्मत म्हणून इंग्रजीत तयार केला. पण ‘चिन्ह’च्या वाचकांसाठी खास मराठीत भाषांतर करून लिहितोय.
“माझी चित्रकला मुळात सध्याच्या जागतिक शोषणाच्या परिस्थितीमध्ये अस्थिभंग झालेल्या प्रतिकांशी संबंधित आहे. जिथे स्थलांतर आणि पृथ्वीच्या संसाधनांचे लोभी शोषण सतत संघर्ष निर्माण करते. लिंग समस्या आणि पितृसत्ताक शोषण माझ्या फॉर्म आणि पोत यांच्या संरचनेवर त्यांच्या सक्तीने अधोरेखित करून गंभीरपणे प्रभावित करते. अमर्याद उपभोग आणि वंचितांचे शोषण करण्याचा भांडवली लोभ हा माझ्या विचार प्रक्रियेचा दुसरा स्तर आहे जो माझ्या कलाकृतीत मातीच्या रंगछटांची निवड ठरवतो. माझे हे सर्व काम (मुख्य शोषणकर्ते आणि प्रदूषक) असलेल्या बड्या उद्योग घराण्यांकडून मिळालेल्या अनुदान आणि उपकारांमुळे शक्य झाले आहे .भारतातील अनिश्चित परिस्थितीत माझी ही कामे ऍमस्टरडॅममध्ये पूर्ण सशुल्क अनुदानावर पार पडली. एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मी भारतातील सामान्य माणसाच्या दयनीय परिस्थितीबद्दल चर्चा केली. हा शो पुढे न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये प्रदर्शित केला जाईल. जगप्रसिद्ध कला संग्राहक ‘घांची आणि घांची’ काही कलाकृती विकत घेत आहेत, आणि उर्वरित कामे माझ्या 1000 चौरस मीटरच्या लंडनमधील स्टुडिओमध्ये पाठवली जातील. सध्या मी चौपाटी सी फेस स्टुडिओमधून घरगुती कामगारांच्या दयनीय स्थितीवर काम करत आहे. त्यांच्यासोबत माझी सहानभूती दाखवण्यासाठी मी माझ्या घरात कोणत्याही घरगुती कामगाराला कामावर ठेवले नाही आणि स्टारबक्स, डोमिनोज आणि झोमॅटो वरून कॉफी वगैरे मागवली. घराची स्वच्छता एजन्सीद्वारे केली जाते.”
यातला गमतीचा भाग सोडला तर कला क्षेत्राची ही एक काळी बाजू आहे. तुमच्या प्रतिक्रिया यावर निश्चित कळवा.
कला समीक्षा कशी केली जाते याचा गमतीदार व्हिडीओ. यातलं काही कळलं तर आम्हालाही समजावून सांगा.
****
– एक चित्रकार मित्र
चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
Related
Please login to join discussion