No products in the cart.
जिद्दी चित्रकार !
येत्या शनिवारी म्हणजे दि २३ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ‘गच्चीवरील गप्पा’ या कार्यक्रमात नाशिकचे चित्रकार पंडित खैरनार हे सहभागी होणार आहेत. श्री खैरनार हे मुळचे नाशिकचे पण शिक्षणासाठी म्हणून मुंबईत आले आणि मुंबईकर झाले. वांद्र्याच्या रहेजा स्कूल ऑफ आर्ट ( आता बंद झालं आहे ) मध्ये त्यांचं शिक्षण झालं. चित्रकला शिक्षण पूर्ण झाल्यावर कुठंही नोकरी करायच्या फंदात ते पडले नाहीत. फक्त पेंटींग करीत राहिले. खूप अडचणी आल्या, संघर्ष करावा लागला. तेव्हा सुरु झालेला संघर्ष अद्याप चालूच आहे असं ते हसत हसत सांगतात.


१९९३ साली मुंबईच्या आर्टिस्ट सेंटर या संस्थेनं मुरुडच्या एम टी डी सी रिसॉर्ट मध्ये एक आर्टिस्ट कॅम्प भरवला होता. त्या कॅम्पसाठी ते निवडले गेले होते. त्या कॅम्पनं आपल्याला चित्रकार म्हणून जगण्यासाठी खूप बळ दिलं असं ते आवर्जून सांगतात. त्या कॅम्पचं प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत भरलं होतं. त्यात त्या कॅम्पमध्ये काढलेली त्यांची सारी चित्रं विकली गेली. आलेल्या पैशात थोडी भर टाकून त्यांनी दहिसरमध्ये स्टुडिओसाठी जागा घेतली. नंतर मात्र त्यांचं चित्रं काढणं कधी थांबलंच नाही असं ते सांगतात.


अलीकडं म्हणजे गेली १०- १५ वर्ष चित्रकला क्षेत्राला मंदीचा खूपच सामना करावा लागला आहे, त्यामुळेच त्यांनी आपल्या मूळ गावी म्हणजे नाशिकला सारं चंबूगबाळं हलवायचा निर्णय घेतला. त्यांचं एक स्वप्न होतं भल्या मोठ्या स्टुडिओत पेंटींग करायचं. ते त्यांनी आता प्रत्यक्षात आणलंय. नाशिकमध्ये चक्क चारसाडेचार हजार चौरस फुटाचा स्टुडिओ बांधलाय. आणि आता तिथं त्यांचं पेंटींग चालतं. एका अतिशय जिद्दी चित्रकारासोबतच्या गप्पा ऐकायला विसरू नका !






Related
Please login to join discussion