No products in the cart.
विनाअनुदानित महाविद्यालयांची मान्यता जाणार ?
महाराष्ट्रातल्या विनाअनुदानित कला महाविद्यालयांनी यंदा उच्च कला परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. त्या संबंधीचे आंदोलन सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. प्रामुख्यानं ही विनाअनुदानित कला महाविद्यालयं चालवणाऱ्या संस्था चालकांनी आपल्या कला महाविद्यालयातील शिक्षकांनाच नव्हे तर विद्यार्थ्यांना देखील हाताशी धरुन या बहिष्काराच्या आंदोलनास सुरुवात केली आहे.
हे आंदोलन जाहीर होताच कला संचालनालय आणि मंत्रालयातील तंत्रशिक्षण खात्याचे अधिकारी यांनी मिळून एक वेगळाच डाव टाकला. विद्यार्थ्यांचे अर्ज त्यांच्या हातात असल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यावरील मोबाईल नंबरवर विद्यार्थ्यांना आवाहन करणारे एस एम एस पाठवले आणि विनंती केली की, ‘आपल्या नजीकच्या परीक्षा केंद्रात जा आणि परीक्षा द्या.’ कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही या हेतूनं त्यांनी हा निर्णय घेतला होता.
पण संस्था चालक आणि कला महाविद्यालयातील शिक्षक या अधिकाऱ्यांचे “बाप” निघाले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मुठीत ठेऊन परिक्षांवरचा बहिष्कार यशस्वी करुन कला संचालनालय आणि उच्च व तंत्र शिक्षण खात्याला चक्क आव्हान दिलं.
या विनाअनुदानित महाविद्यालयांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यातली एक मागणी आहे शैक्षणिक शुल्क वाढवण्याची. ती वाचून जेजे कॅम्पसमधले काही शिक्षक अक्षरशः संतापले म्हणाले यांना आता शैक्षणिक शुल्क वाढवून हवंय. आम्ही डिनोव्हो मागितलं तर हे विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरवू लागले की डिनोव्होमुळे कशी भयंकर फीमध्ये वाढ होईल वगैरे. त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देता देता आमचे अक्षरशः नाकीनऊ आले. आणि आता हेच सारे फी वाढवून द्या म्हणून सरकारच्या मागे लागलेत. परीक्षांवर बहिष्कार टाकून विद्यार्थ्यांवर अन्याय करतायेत, हा कुठला न्याय ?
उच्चशिक्षण खात्याचे अधिकारी आता संतापले आहेत. या विनाअनुदानितवाल्याना चांगला धडा शिकवण्याच्या मनस्थितीत ते आले आहेत. हा धडा कसला असेल ते आता सांगता येत नाही पण या साऱ्यांना जन्माची अद्दल घडवली जाईल हे निश्चित असं जेजे कॅम्पसमध्ये बोललं जातं आहे.
******
Related
Please login to join discussion