No products in the cart.
‘नग्नता’ आणि कोरोना नंतरचा काळ !
कोरोना लॉकडाऊन नंतर साऱ्याच गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला आहे. विशेषतः ‘नग्नता’ किंवा ‘न्यूडिटी’ याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात खूपच मोठा फरक झाला आहे. ज्यावेळी ‘नग्नता’ अंक प्रसिद्ध करायचं ठरलं तेव्हा ऑर्कुट जाऊन फेसबुक नुकतंच सुरु झालं होतं. साहजिकच फेसबुकवर ‘नग्नता’ अंकातल्या पोस्ट प्रकाशित करताना अनेकदा पंचाईत व्हायची. आम्ही अतिशय काळजीपूर्वक पोस्ट लिहीत होतो. चित्रांची निवड करताना देखील खूपच भान ठेवत होतो. तरी देखील अधनंमधनं फेसबुककडून आमच्या पोस्ट ब्लॉक केल्या जात असतं. पण नंतर त्या सुरुही केल्या जात असतं. त्यामुळं त्या काळात अंकाची प्रसिद्धी करताना फारसा तणाव जाणवला नाही. पण नंतर नंतर म्हणजे अगदी अलीकडच्या काळात ‘चिन्ह’च्या पोस्ट बॅन होऊ लागल्या. यातला गंमतीचा भाग असा की, दहा अकरा वर्षापूर्वी जी चित्रं किंवा फोटो बॅन केले नव्हते. ते नंतरच्या काळात बॅन केले जाऊ लागले. हे कदाचित फेसबुकमुळे चुकीचा प्रसार होऊन ज्या दंगली उसळल्या आणि मग सरकारकडून त्यावर जी बंधन लादली जाऊ लागली, त्यातून हे घडलं असावं. ‘नग्नता’ अंकाच्या पेजवर गेलात आणि सुरुवाती पासूनच्या पोस्ट आणि त्या सोबतची चित्रं पाहिलीत तर हे अगदी स्पष्टपणे जाणवतं. तुमच्याही लक्षात येईल की सुरुवातीचा मोकळेपणा आता राहिलेला नाही.
पण वाचक प्रतिसादाबद्दल म्हणाल तर अगदी वेगळाच अनुभव आम्हाला आला आहे. अंक प्रसिद्ध झाला त्या किंवा नंतरच्या काळातला वाचक हा मध्यमवयीन होता. प्रामुख्यानं चाळीशी – पन्नाशीचा होता . क्वचित साठी सत्तरीतले वाचक देखील हा अंक मागवीत असत. आणि अंक कसा पाठवणार हा प्रश्न खोदून खोदून विचारात असत. हे कशासाठी तर आपण कुठला अंक वाचतोय हे घरातल्या मुलं – नातवंडांना कळू नये, इतकंच काय पण पोस्टमन किंवा कुरियरवाल्याना देखील कळू नये यासाठी त्यांना कोण चिंता असे. आणि आम्ही अंक चांगला खास डिझाईन केलेला कोरोगेटेड बॉक्स मधून पाठवतो असं सांगितलं की ते अतिशय आश्वस्त होत. पण त्या काळात महिला वाचकांनी हा अंक उचलून धरला होता हे मात्र आवर्जून सांगावसं वाटतं.
आता अंक प्रसिद्ध झाल्याला बरोब्बर एक तप उलटलंय. आणि कोरोना नंतर तर साऱ्यांच्याच दृष्टिकोनात मोठा बदल घडला आहे हे मात्र चटकन जाणवतं. आता वाचकांमध्ये झालेले बदल देखील मोठे रोचक आहेत. उदाहरणार्थ ; तरुण मुलींकडून या अंकाला मोठी मागणी येते आहे. हा बदल का झाला हे सांगायला आम्ही काही मानसशात्रज्ञ नव्हे, पण मोठ्या प्रमाणावर तरुण मुलींकडून अलीकडच्या काळात हा अंक मागवला जातो आहे ही वस्तुस्थिती आहे. आता तुम्ही विचारलं नावावरुन मुली तरुण आहेत किंवा नाही हे तुम्हाला कसं कळतं ? तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे व्हाट्सअपवर वापरलेल्या डीपीजवरुन. एखाद्या दिवशी दहा संचाची मागणी आली की त्यात सहा ते सात तरुण मुली असतात. काळ झपाट्यानं बदलतो आहे हेच खरं.
परवा ‘वाचता वाचता’ समूहाच्या स्नेहसंमेलनात कुणीतरी कृष्णराव मराठ्यांचा विषय काढला आणि ‘नग्नता’ अंक प्रसिद्ध केला तेव्हा कृष्णराव मराठ्यांची किती जरब होती याचा किस्सा मी जेव्हा कथन केला तेव्हा खूप मोठा हशा पिकला होता. तेव्हाच मला जाणवलं की आता कृष्णराव मराठे यांचं भय कुठल्या कुठे पळून गेलं आहे. हा देखील कोरोनाचाच प्रभाव असावा.
सांगायचा मुद्दा असा की तुमच्या संग्रहात ‘नग्नता’ अंक नसेल तर आजच मागवून घ्या. कारण तिसऱ्या आवृत्तीच्या आता थोडयाच प्रती उरल्या आहेत. आणि यानंतर ‘नग्नता’ अंकाची नवी आवृत्ती कितीही मागणी आली तरी प्रसिद्ध करायची नाही, असा निर्णय देखील आम्ही घेतलेला आहे. बारा वर्षापूर्वी केलेल्या जाहिराती आणि सध्याच्या सवलत योजनेची जाहिरात सोबत फोटोजमध्ये देत आहोत. जिज्ञासू वाचकांनी अवश्य संपर्क साधावा.
****
Related
Please login to join discussion