No products in the cart.
पुन्हा एकदा गायतोंडे !
भारतीय अमूर्त चित्रकलेचे प्रणेते प्रख्यात चित्रकार वासुदेव उर्फ व्ही एस गायतोंडे यांचं एक चित्र नुकतंच भारतात झालेल्या एका लिलावात जवळ जवळ ४८ कोटी इतकी बोली लावून विकलं गेलं. हा एक प्रकारे गायतोंडे यांच्या चित्रांचा विक्रमच ठरावा. या संदर्भातली पोस्ट ‘चिन्ह’च्या सोशल मीडियावर येताच ती व्हायरल झाली. म्हणूनच या संदर्भात यु ट्यूबवर व्हिडीओ बनवायचं असं ठरवलं.

या संदर्भात बोलायला बोलवायचं तरी कोणाला असं प्रश्न पुढं आला तेव्हा अर्थातच पहिलं नाव समोर आलं ते गोव्याचे अमूर्त चित्रकार सुहास शिलकर यांचं. ते का तर एक म्हणजे त्यांचा गायतोंडे यांच्या चित्रांचा अभ्यास मोठा दांडगा आहे, आणि दुसरं म्हणजे – सर्व साधारणपणे चित्रकार मंडळींचा लिलावांच्या दुनियेशी तसा काही फारसा संबंध नसतो, पण शिलकर मात्र याला अपवाद आहेत. भारतातल्या नव्हेच तर जगभरातल्या लिलावांकडे त्यांचं पणजीत बसून त्यांचं बारकाईनं लक्ष असतं.
कुठल्या चित्रकाराचं चित्र या वेळी विक्रम करेल, कुठल्या चित्रकाराच्या चित्रांना या वेळी फारशी मागणी नसणार आहे वगैरे संदर्भात त्यांची माहिती आणि विश्लेषण अगदी अचूक असतं. हे कशामुळे तर एका कला संग्राहकांसोबत झालेल्या त्यांच्या मैत्रीमुळे. त्या कला संग्राहकाचं नाव आम्ही सांगण्यापेक्षा उद्या प्रसारित होणाऱ्या व्हिडीओमधूनच समजून घ्यावं हे बरं !
बोलता बोलता शिलकर हे फटाफट अनेक संदर्भ तुमच्या समोर टाकत जातात. ते केवळ भारतीय कले संदर्भातच नसतात तर जागतिक कलेबद्दल सुद्धा असू शकतात. म्हणूनच त्यांच्याशी फोनवरुन गप्पा मारणं हा अतिशय आनंददायक अनुभव असतो. गोव्यात राहून त्यांनी मराठी देखील छान जपली आहे. मराठी साहित्यातले संदर्भ देखील ते धडाधड तुम्हाला सांगत जातात. साहित्य – कलाच नाही तर अध्यात्माचा देखील त्यांचा अभ्यास आहे. रमण महर्षी, जे कृष्णमूर्ती सारं काही त्यांनी वाचलं आहे. निसर्गदत्त महाराजांना ते अतिशय मानतात. गायतोंडे यांना जेव्हा ते दिल्लीत भेटायला गेले तेव्हा गोव्याच्या समुद्रातला बांगडा, गायतोंडे यांचे बालमित्र शांतू आमोणकर आणि निसर्ग दत्त महाराज यांच्या संदर्भात काय काय बोलणं झालं या विषयी ते जेव्हा सांगू लागतात तेव्हा मोठी मौज उडते आणि वेळ कसा जातो ते कळत देखील नाही. खरं तर तीस मिनिटाचाच व्हिडीओ करायचं ठरलं होतं पण बोलता बोलता पन्नास मिनिट कशी निघून गेली ते कळलंच नाही.
अवश्य पाहा हा व्हिडीओ. चित्रकलेच्या विश्वाचं एक वेगळंच दर्शन तुम्हाला त्यातनं होईल याची आम्हाला खात्री आहे.
******
– सतीश नाईक
संपादक चिन्ह आर्ट न्युज
सुहास शिलकरांशी ‘गच्चीवरील गप्पा’ या मागील कार्यक्रमात सतीश नाईक यांच्याशी संवाद.
Related
Please login to join discussion