News

प्रदीप वर्मा यांचे निधन

जेजे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी आणि अमरावती मधील लोकप्रिय कलाशिक्षक प्रदीप वर्मा यांचे आज दि १३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. प्रदीप वर्मा हे मूळचे अमरावतीचेच रहिवासी. १९८१ मध्ये त्यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये पेंटिंग डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. तिथे डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी पदवीही प्राप्त केली. पुढे ते नवोदय विद्यालयामध्ये कला शिक्षक म्हणून रुजू झाले. जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये ते १९८४-८५ आणि १९८५-८६ असे सलग दोन वर्ष जीएस म्हणून निवडून आले होते. विद्यार्थीप्रिय नेता म्हणून त्यांची जेजेमध्ये ख्याती होती. सर्व विद्यार्थ्यांना ते खूप मदत करत असत.

नवोदय विद्यालयाच्या प्रदर्शनामध्ये प्रदीप वर्मा. (डावीकडे)

जेजेमध्ये जे दोन अभूतपूर्व संप घडून आले त्याचे ते महत्वाचे शिलेदार होते. जेजे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांना डिग्री मिळावी म्हणून ते संपात सक्रियपणे सहभागी झाले होते. त्यांनी उपोषणही केले होते. हा संप यशस्वीरीत्या पूर्ण झाला आणि विद्यार्थ्यांना डिग्री मिळण्यास सुरुवात झाली. दुसरा संप हा तत्कालीन कला संचालक बाबुराव सडवेलकर यांच्या विरोधात त्यांनी केला. विशेष म्हणजे बाबुराव सडवेलकर यांचे चिरंजीव शील सडवेलकर यांचे प्रदीप वर्मा वर्गमित्र होते. हे दोन्ही संप प्रदीप वर्मा यांनी यशस्वी केले.

जेजे स्कूल ऑफ आर्टमधल्या एका कार्यक्रमात डावीकडून तिसरे प्रदीप वर्मा (उभी रांग). सोबत डीन वसंत परब.

प्रदीप वर्मा यांची राहणी अत्यंत साधी होती पण कार्यकर्ता म्हणून ते आक्रमक आणि धडाडीचे होते. त्यांच्या जीएसपदाच्या काळात त्यांनी कलावेधसाठी अनेक कार्यक्रम आखले. विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणीत मदत केली. पुढे नवोदय विद्यालयात कला शिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांची कला जाणीव विकसित व्हावी म्हणून त्यांनी अनेक उपक्रम आयोजित केले. यात विद्यार्थ्यांची प्रदर्शने आयोजित करणे, कार्यशाळा घेणे अशा प्रकल्पांचा समावेश होता. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मार्गदर्शन केले. अनेक विद्यार्थ्यांना कला शिक्षणासाठी त्यांनी आर्थिक मदतही केली.

त्यांच्या निधनामुळे विद्यार्थी आणि कलेसाठी काम करणारा एक धडाडीचा कार्यकर्ता आज हरवला आहे. प्रदीप वर्मा यांना ” चिन्ह आर्ट न्यूज” परिवारातर्फे श्रद्धांजली.

(सर्व फोटो मंगेश चोरगे यांच्याकडून साभार. )

****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.