No products in the cart.
जेजेत विद्यार्थी प्रतिनिधींचे राजीनामे !
‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’च्या तीनही विद्यार्थी प्रतिनिधींनी आज सकाळी आपल्या पदाचे राजीनामे अधिष्ठात्यांकडे दिले असल्याचं वृत्त आहे. जेजेमध्ये संप सुरु झाल्यापासून विद्यार्थी आणि या विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये वादावादीला सुरुवात झाली आणि त्याचे पर्यवसान आज या विद्यार्थी प्रतिनिधींच्या राजीनाम्यात झाल्याचे सांगितले जाते. खरं तर या तीनही विद्यार्थी प्रतिनिधींची नेमणूकच मुळात चुकीच्या पायावर झाली असल्याचे काही ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या नियमांनुसार प्रत्येक वर्गातल्या परीक्षेत पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांची नेमणूक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून केली जाते. पण विद्यापीठाचे नियम धाब्यावर बसवण्याची सवय लावलेल्या अधिष्ठाता साबळेसाहेबानी विद्यार्थ्यांच्या नेमणुकीच्या बाबतीतही अपवाद केला नाही आणि इंटेरियर डेकोरेशनच्या वर्गातील दोन विद्यार्थ्यांची नेमणूक, त्यातल्या संतोष पारकर या विद्यार्थ्यांची जनरल सेक्रेटरी म्हणून नेमणूक करुन टाकली. तर धनश्री घाडी या विद्यार्थिनीची नेमणूक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून करून टाकली. तर फाईन आर्ट विभागाच्या अजिंक्य हिंदळेकर या विद्यार्थ्यांची नेमणूक विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून करुन टाकली. हा सरळ सरळ नियमभंग होता. पण साबळेसाहेबांचे हात मंत्रालयापर्यंत पोहोचले असल्यामुळं असल्या नियमांना विचारतं कोण ?
जेजेत अचानक विद्यार्थ्यांचा संप सुरु झाला आणि तिथूनच विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडण्यास सुरुवात झाली. संप करणारे आणि संपाला विरोध करणारे असे दोन गट पडले. बहुतांशी विद्यार्थी हे संप न करण्याच्या मताचे होते. पण डीनोव्होला विरोध करणाऱ्या काही भोचक शिक्षकांच्या दबावामुळं विद्यार्थी प्रतिनिधींना संप करावा लागल्याचे बोलले जाते. ‘चिन्ह’ या संपाच्या घडामोडींकडे बारकाईनं लक्ष ठेऊन होतं आणि म्हणूनच ‘चिन्ह’नं विद्यार्थ्यांची पहिली सभा सुरु होताच ती संपायच्या आतच बातमी प्रसारित केली. संपाला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘चिन्ह’च्या बातमीमुळं वस्तुस्थिती समजली आणि तिथंच विद्यार्थ्यांमध्ये फूट पडायला सुरुवात झाली. आठ दहा दिवसाचा संप केल्यावर काहीच हाती लागले नाही उलट तो संप मागे घ्यावा लागला. आणि नाचक्की सहन करावी लागली यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठया मतभेदांना सुरुवात झाली.
त्याच पर्यावसान कॉलेज मधील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वगैरे काढलेल्या प्रत्येकी १०००/- रुपयांच्या हिशोबावरुन कुजबुजीला सुरुवात होण्यात झालं आणि ‘कलावेध’ स्पर्धेच्या आयोजनाच्या फजितीवाड्यावरुन मतभेद प्रचंड विकोपाला गेले. ४८०० विद्यार्थी २५०/- रुपये भरून स्पर्धेला बसतात, ३०० विद्यार्थी २५०/- रुपये न भरता परीक्षेला बसतात आणि पावत्या फक्त ३७०० मुलांच्याच फाडल्या जातात हे कसे ? स्पर्धेचे आयोजन पूर्णतः फसते, महाराष्ट्र टाइम्स सारख्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर नकारात्मक बातमी येते आणि आपण विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देखील न मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये टोकाच्या भांडणाला सुरुवात झाली आणि त्याचेच पर्यावसान अखेर जनरल सेक्रेटरीचा राजीनामा मागण्यात झाली असे सांगितले जाते. जनरल सेक्रेटरीने आपण एकटेच राजीनामा देणार नाही असे सांगितले आणि बाकीच्या प्रतिनिधींनी देखील राजीनामा द्यावा असा आग्रह धरला. बाकी सर्व विद्यार्थ्यांनी देखील आता आम्हाला कुणीच विद्यार्थी प्रतिनिधी नको, स्नेहसंमेलन वगैरे आमचं आम्हीच करु असं सांगून तो मान्य देखील केला. या सगळ्या भानगडीत ते बिचारे विद्यार्थी आधी जेजेच्या ५०० विद्यार्थ्यांकडून जमा केलेल्या प्रत्येकी १०००/- रुपयाचा हिशोब आणि ‘कलावेध’ स्पर्धेत सहभागी झालेल्या ४८०० विद्यार्थ्यांनी भरलेल्या प्रत्येकी २५०/- रुपयांच्या हिशोबाचे काय असा प्रश्न संबंधितांना विचारायलाच विसरले. पण ते विद्यार्थी विसरले असले तरी ‘चिन्ह’ मात्र ते विसरलेलं नाही ‘चिन्ह’ प्रश्न विचारतच राहणार आहे.
*****
Related
Please login to join discussion