News

५ एप्रिल ही तारीख राखून ठेवा !

प्रतीक जाधव, सायकलवर भारतभ्रमण करणारा एक ध्येयवेडा शिल्पकार ! त्याच्यासारख्या तरुणांना खरं तर वेडाच म्हणावं लागेल. बीडसारख्या भागातून आलेला हा मुलगा. अभ्यासात हुशार. एवढा हुशार की त्याची अभ्यासातली गती बघून एका कोचिंग क्लासने मेडिकल प्रवेशपरीक्षेसाठी त्याला मोफत प्रवेश दिलेला. पण या पट्ठ्याने मात्र कलेचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेऊन टाकला. कलेच्या सीईटीमधून त्याला नागपूरच्या शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला पेंटिंगसाठी. पण आईला कॅन्सर झाला असल्याने तो हे सोडून आईची सेवा करण्यासाठी बीडला पोहोचला. दुर्दैवानं त्याच्या आईचं निधन झालं. पण कुठेही न डगमगता त्यानं पुन्हा सीईटी दिली आणि थेट जेजेमध्ये प्रवेश मिळवला!

इथे शिकत असताना त्याचा ओढा लोककला, आदिवासी कलेकडे होता. आदिवासींच्या दृश्यकलेचं शिक्षण आपल्या प्रचलित शिक्षणव्यवस्थेत कुठेही मिळत नसल्याने त्याने भारत भ्रमण करून या कलांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. मूळचा प्रवास दोन वर्षांचा होता. पण दोन वर्ष कोरोनानं खाल्ली. पण हा डगमगला नाही जवळ जवळ या प्रकल्पात चार वर्ष गेली, पण त्यानं तो यशस्वीपणे पूर्ण केलाच.

एवढं धाडस एखाद्या तरुणांमध्ये येतं कुठून ? कारण एवढा मोठा आपला भारत सायकलवरून पिंजून काढायचा म्हणजे खायचं काम काही. त्यात राहायचं कुठे, रस्त्यात लोक कसे भेटतील, आदिवासींची भाषा, चालीरीती वेगळ्या ते आपलं स्वागत करतील का ? असे असंख्य प्रश्न होते. शिवाय एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी आर्थिक पाठबळ काहीच नव्हतं तेव्हा नियोजन कसं करायचं असे प्रश्न प्रतीकसमोर होते. अशा आव्हानांना सामोरं जाऊन प्रतिकने जिद्दीने आपली सायकल भ्रमंती सुरु केली. त्याचा हा सायकलवरील ‘कला प्रवास’ आता शेवटच्या टप्प्यात आहे. पाच एप्रिलला तो ठाण्यात येत आहे तेही सतीश नाईक यांना भेटायला. तिथे सतीश नाईक त्याच्याशी संवाद साधतील. पुढे ६ एप्रिलला त्याच्या या कला प्रवासाची सांगता जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये होणार आहे.

प्रतीकनं मिळवलेलं हे यश ‘चिन्ह’नं सेलिब्रेट करायचं ठरवलंय. त्याला आलेले अनुभव तो पुन्हा एकदा ‘चिन्ह’चं यु ट्यूब चॅनेल आणि फेसबुक तसेच इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याशी शेअर करणार आहे. सतीश नाईक त्याला बोलतं करतीलच, पण त्याचं जंगी स्वागतही आपण करणार आहोत. शक्य झालं तर हा कार्यक्रम खाजगी न करता सार्वजनिक स्वरूपात करण्याचा विचार आहे. त्यावेळी तुम्हाला रीतसर निमंत्रणही करण्यात येईल. वेळ, तारीख आणि जागा लवकरच जाहीर करू. तोपर्यंत ‘चिन्ह’च्या ‘गच्चीवरील गप्पा’ कार्यक्रमात सतीश नाईक यांनी प्रतीक जाधवशी मारलेल्या गप्पा आवर्जून बघा. प्रतीकचा थक्क करणारा हा प्रवास जाणून घ्या.

एक मराठी मुलगा, कलेच्या क्षेत्रात एवढा धाडसी प्रयोग करतोय. देशभर उन्हापावसात फिरून वेगवेगळ्या कलांचं डॉक्युमेंटेशन करतोय. आपण कौतुकात कुठे कमी पडायला नको ना. तेव्हा या आगामी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा ! द्याल ना नक्की ?

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.