No products in the cart.
NGMA मध्ये ‘स्त्री शक्ती’ !
मुंबईतल्या NGMA म्हणजेच नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट या गॅलरीत गेल्या मंगळवारपासून ‘शक्ती’ नावाचं चित्रकार रिनी धुमाळ यांनी रेखाटलेल्या स्त्रीशी संबंधित चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. त्यांच्या चित्र रेखाटण्याचा निराळ्या शैलीमुळे ते प्रदर्शन अतिशय प्रेक्षणीय झालं आहे. कालच ‘चिन्ह’च्या प्रतिनिधीनं या प्रदर्शनाला भेट दिली. हे प्रदर्शन आवर्जून भेट देण्यासारखं आहे.
गॅलरीच्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावर चित्रकार रिनी धुमाळ यांनी सुरुवातीच्या काळापासून त्यांच्या चित्रकलेच्या शैलीत झालेला बदल, त्यांनी हाताळलेल्या विविध शैली, अक्रोडच्या लाकडावर रंगकाम केलेली ‘संदूक’ नावाची त्यांची मालिका, त्यांची गाजलेली कामं प्रदर्शित करण्यात आली आहेत. दुसरा मजला स्केचबुक, रेखाचित्रं, कॅनव्हासवरील मिश्र माध्यम, ग्राफिक प्रिंट्स, एचिंग्ज, सिल्कस्क्रीन या त्यांच्या विविध कलाकृतींनी सजवला आहे. तसंच पॉलिक्रोमद्वारे पेंट केलेल्या अनेक आकर्षक वस्तू तिथं प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. तिसऱ्या मजल्यावर त्यांचं शेवटचं चित्र तसंच अपूर्ण राहिलेलं चित्र, त्यांची कलर पॅलेट, चित्रकला करताना त्या त्यांच्या स्टुडियोत वापरत असलेल्या असंख्य गोष्टी या प्रदर्शनात त्यांची आठवण करून देत होतं आणि त्यांचा जीवनप्रवास एका स्क्रीनवर तिथं प्रदर्शित करण्यात आला आहे. NGMA मधील डोम म्हणजेच सर्वात वरचा मजला स्त्री होण्याच्या प्रवासाच्या सामूहिक शक्तीचं प्रतिनिधित्व करतो. ‘शक्ती’च्या अनेक भावना व्यक्त करणारं हे प्रदर्शन पाहून उपस्थित कलाप्रेमी थक्क झाले होते. प्रत्येक फ्रेमवर लाईटनं दिलेला फोकस इतका अप्रतिम होता की त्या फ्रेममागूनच लाईट येतोय की काय ? असा समज होतो. तिथं चाललेलं बासरीचं बारीकसं संगीत चित्र पाहणाऱ्याला अधिक तल्लीन करत होती. तिथलं जादू भरलं वातावरण चित्रकार रिनी धुमाळ यांच्या चित्रांना न्याय देत होतं.
चित्रकार रिनी धुमाळ यांनी चित्रकलेतील अनेक शैलींमध्ये काम केलं आहे. प्रिन्टमेकर आणि पेंटर म्हणून त्या विख्यात आहेतच, पण सिरॅमिक, ब्रॉन्झ, टेराकोट्टा आणि टेपेस्ट्री या शैलींमध्ये सुद्धा त्यांनी खूप काम केलं आहे. ऑइल, ऍक्रेलिक, वॉटर कलर या वैविध्यपूर्ण माध्यमांचा त्यांनी त्यांच्या चित्रकलेत वापर केला आहे. दुर्दैवानं कोरोना काळातच त्यांचं निधन झालं. त्यांचं अपूर्ण राहिलेलं चित्र देखील या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आलं आहे. आवर्जून भेट द्यावी असं हे प्रदर्शन आहे.
Related
Please login to join discussion