No products in the cart.
शकुंतला कुलकर्णी केमोल्डमध्ये !
ज्येष्ठ चित्रकार शकुंतला कुलकर्णी यांचे ‘ क्वायटर दॅन सायलेन्स’ हे प्रदर्शन केमोल्ड प्रेसकॉल्ट रोड गॅलरी येथे दि ९ मार्च ते ३० मार्च २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. शकुंतला या आंतराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवणाऱ्या आघाडीच्या मराठी चित्रकारांपैकी एक आहेत. पेंटिंग आणि रेखाचित्रांबरोबरच शिल्प, इन्स्टॉलेशन, व्हिडीओ आर्ट, परफॉर्मन्स आर्ट अशा वेगवेगळ्या माध्यमात त्यांनी प्रयोग केले आहेत. माध्यम जरी वैविध्यपूर्ण असले तरी महिलांचे भावविश्व हे शकुंतला कुलकर्णी यांच्या कलाकृतींचा महत्वाचा विषय आहे. शकुंतला यांच्यासाठी विविध माध्यमात काम करताना रेखाटन ही कलाकृतीची मूळ प्रेरणा राहिली आहे. प्रस्तुत प्रदर्शनातील सात रेखाटने ही वेदना, हिंसा, प्रतिकार आणि त्यातून महिलांचं मोकळं होणं याचे चित्रण करतात.
फॉलन वॉरिअर, शॅटर्ड, अंतहीन अशी शीर्षक असलेल्या या कलाकृती प्रस्तुत प्रदर्शनाचा गडद वेदनामयी भाव अधोरेखित करतात. प्रस्तुत प्रदर्शन हे सुरक्षितता आणि स्वातंत्र्याची हानी यांचा परस्पर संबंध अधोरेखित करते. महिलांचे जीवन किती कष्टमय असू शकते, अनेक सामाजिक घडामोडी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर जो वेदनादायी परिणाम करतात यांचे मूक दर्शन या प्रदर्शनातुन होते, त्यामुळे ‘ क्वायटर दॅन सायलेन्स’ असे समर्पक शीर्षक या प्रदर्शनाला दिले आहे.
शकुंतला कुलकर्णी यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि एमएसयू बडोदा येथे आपले चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केले. शांतिनिकेतन येथे सोमनाथ होरे यांच्याकडे त्यांनी कलेचे प्रशिक्षण घेतले आहे. प्रस्तुत प्रदर्शनाची वेळ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे.
****
Related
Please login to join discussion