News

शरद आणि सुचिता तरडे दिल्लीत… 

चित्रकार शरद आणि सुचिता तरडे यांचे ‘परसेप्शन ३’ हे प्रदर्शन दिल्लीच्या इंडियन हॅबीटाट सेंटर येथील फोयर गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचा कालावधी दि ०३ ते ०७ मार्च २०२३ दरम्यान आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११.०० ते ०७.०० आहे.

शरद आणि सुचिता तरडे हे पुणे येथील चित्रकार दांपत्य आहे. त्यांची बहुत्येक प्रदर्शनं जोडीनं होतात. शरद यांनी फोटोग्राफी या विषयात पदवी प्राप्त केली असून गेली ४० वर्षे ते चित्रकार म्हणून काम करत आहेत. सुचिता यांनी चित्रकलेमध्ये एमए पूर्ण केले असून त्या ३५ वर्षांपासून चित्रकार म्हणून काम करत आहेत. पुणे येथे शरद आणि सुचिता तरडे यांचा ‘कॅलिडिस्कोप’ हा स्टुडिओ आहे.

सुचिता तरडे यांची कलाकृती.

‘परसेप्शन’ हे तरडे दाम्पत्याच्या अमूर्त शैलीतील चित्रांचे प्रदर्शन आहे. शरद तरडे हे अमूर्त चित्रांच्या माध्यमातून आंतरिक शोध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या रचना ज्ञात ते अज्ञात अशा नवीन प्रवासाला प्रोत्साहन देतात ज्यामध्ये कोणत्याही पूर्वनियोजित कल्पना नसतात. शरद तरडे यांची संपूर्ण कला प्रक्रिया ही आत्मशोधाचा प्रयत्न आहे ज्यातून सौंदर्यात्मक कला दृश्य सादर होते.

शरद तरडे यांची कलाकृती.

अनेकदा आपल्याला अमूर्त चित्रातून काहीतरी आकार, अर्थ शोधण्याची घाई असते. योगायोगाने प्रेक्षकांना कलाकृतीत काही आकार सापडतातही पण शरद तरडे यांची चित्रे हा योगायोग टाळून शुद्ध दृश्यनुभवालाच महत्व देतात. एकप्रकारे तरडे हे कॅनव्हासला रंगांच्या माध्यमातून शुद्ध करतात आणि सृष्टी सौन्दर्याचे मंदिर रसिकांपुढे खुले होते.

सुचिता तरडे यांची चित्रे म्हणजे अमूर्त कलाकृतीच्या माध्यमातून जीवनातील अनाकलनीय बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न असतो. हे गूढ जाणून घेणे म्हणजे एकप्रकारचा आत्मशोधच होय. जी की शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळीवर निसर्गशक्तींनी घेतलेली परीक्षा असते. या परीक्षेतील उत्तरे म्हणजे तयार झालेली कलाकृती होय. सुचिता यांची चित्रे हा आत्मशोध अत्यंत गंभीरपणे घेतात. सृष्टीचे गूढ जाणून घेण्याचा त्यांचा प्रवास हा कॅनव्हासवर जे जोरकस रंग त्या वापरतात त्यातून दिसतो.

आत्मा हा आदिशक्तीशी अनंत काळापासून जोडलेला आहे. बाह्य प्रलोभनांच्या अडथळ्यांमुळे आत्म्याला या गोष्टीचा विसर पडतो. अशावेळी निसर्गाच्या जवळ जाणे इष्ट ठरते. कलाकृती या चित्रकार आणि रसिक या दोघांनाही सृष्टीच्या जवळ पोहोचवतात. ‘परसेप्शन ३’ हे प्रदर्शन तरडे दांपत्याचा असाच निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आहे.

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.