News

जहांगीरमध्ये शिरीष मिठबावकर !

चित्रकार शिरीष मिठबावकर यांचं ‘डिग्निटी ऑफ लव्ह’ या शीर्षकाचं प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये दि 16 ते 22 मे 2023 दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे. शिरीष मिठबावकर यांची ही चित्र मालिका राधा – कृष्ण यांच्या दैवी प्रेमाला समर्पित आहे. शिरीष मिठबावकर हे कला शिक्षक आणि प्रिंट मेकिंगमधील मास्टर आर्टिस्ट म्हणून सुपरिचित आहेत. पण या प्रदर्शनांमधून मिठबावकरांचे रंग आणि कॅनव्हासवरील प्रभुत्व कला रसिकांना पाहता येईल. विशेष म्हणजे त्यांची या प्रदर्शनातील चित्रं कला रसिक ‘चिन्ह’च्या ऑनलाईन आर्ट गॅलरीमध्ये दि 17 मे ते 01 जून 2023 दरम्यान पाहू शकतील.

प्रेम ही चराचर व्यापून टाकणारी भावना आहे. राधा – कृष्णाच्या प्रतिमा या भावनेच्या प्रकटीकरणाचं प्रतीक म्हणून सुपरिचित आहेत. याच दैवी प्रेमाला प्रतीकात्मकरित्या कॅनव्हासवर मांडणं ही या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. १६ व्या आणि १७ व्या शतकात मिनिएचर शैलीच्या माध्यमातून राधा – कृष्ण किंवा एकूणच प्रेम या मध्यवर्ती संकल्पनेवर बहुतांश चित्रण झालं  आहे. या संकल्पनेवर मिठबावकरांनी अनेक अमूर्त आणि प्रतीकात्मक प्रयोग करून प्रस्तुत प्रदर्शनातील कलाकृतींची निर्मिती केली आहे.
राधा – कृष्ण हे एकमेकांना प्रेमाच्या अदृश्य धाग्यानं अशा प्रकारे जोडले आहेत की राधा आणि कृष्ण यांचा उल्लेख एकत्रितच करण्यात येतो. राधा कृष्णाचं एकत्र असणं जगातील  सर्वच प्रेमिकांना प्रेरणा देतं. हे प्रेम प्रतीकांच्या माध्यमातून मिठबावकरांनी चित्रित केलं आहे. मोरपीस हे कृष्णाच्या मुकुटात शोभून दिसतं पण प्रेम, सौन्दर्य, हळवेपणा याचं हे एक सुंदर प्रतीक आहे. आणि हीच मिठबावकरांच्या चित्रांची प्रेरणा आहे.

अशी अनेक प्रतीके मिठबावकरांनी आपल्या चित्रांमध्ये विशिष्ट भावना दर्शवण्यासाठी वापरली आहेत. घोडा हे शक्तीचं प्रतीक आहे. बैल हे सामर्थ्य आणि प्रजनन क्षमतेचं प्रतीक आहे. शंख हे जागरूकतेचं प्रतीक आहे. चक्र, गदा ही आयुधे आणि पद्म ही दैवी शक्तीची प्रतीकं आहेत.

प्रस्तुत चित्रमालिकेतील एक चित्र हे यमुना तीराचं प्रतीकात्मक चित्रण करते. ‘द्वारकाधीश’ हे चित्र कृष्णाचं नगर द्वारकेबद्दलचं महत्व प्रदर्शित करतं. एका चित्रामध्ये मिठबावकर समकालीन काळाशी सुसंगत यशोदा मातेचं चित्रण करतात. काही चित्रांमध्ये मिठबावकरांनी कृष्णच्या अप्रत्यक्ष अस्तित्वाचं अमूर्त चित्रण गायीच्या मेळ्यात केलं आहे. मिठबावकरांच्या काही चित्रांमध्ये छायाप्रकाशाचं अद्भुत नाट्य पाहायला मिळतं. मिठबावकरांचं चित्र माध्यमांवरील प्रभुत्व त्यांच्या कॅनव्हासवरील कौशल्य आणि कलेच्या मूलतत्वाच्या सुरेख मिलाफातून दिसून येतं. बिंदू, आकारांच्या असंख्य प्रयोगातून ही मोहक आणि प्रेमाचं तत्त्वचिंतन करणारी चित्रं तयार झाली आहेत.

मिठबावकरांना चित्रकला, चित्रपट, जाहिरातकला अशा विविध माध्यमांचा समृद्ध अनुभव आहे. या अनुभवामुळे त्यांची चित्रं वेगळी आणि आकर्षक ठरतात. समृद्ध अनुभवामुळेच त्यांची चित्रं ही कल्पक आणि अनुकरणाला टाळणारी आहेत. आपल्या अनुभवाचा कौशल्यपूर्ण उपयोग करून मिठबावकरांनी आपली स्वतंत्र शैली तयार केली आहे. शांतपणे पाहिल्यास मिठबावकरांची चित्रं अंतर्मन आणि बाह्य जग यांना जोडणारी ठरतात. कॅनव्हासवर मिठबावकरांची चित्रं भावनांचं इंद्रधनुष्य साकार करतात. मानवाला परमात्म्याच्या दैवी शक्तीशी परिचय करून देतात.

हे प्रदर्शन रसिकांना सकाळी 11:00 ते संध्याकाळी 7:00 वाजेपर्यंत पाहता येईल.

शिरीष मिठबावकरांचे चिन्ह ऑनलाईन गॅलरीमधील प्रदर्शन खालील लिंकवर क्लीक करून पाहता येईल.

Dignity of Love

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.