News

थूक लगाना मना है!

एकीकडे काही माणसांचं दैवतीकरण करायचं, जनमानसात निर्माण झालेली त्यांची प्रतिमा स्वतःच्या फायद्यासाठी वापरायची, आणि दुसरीकडे त्यांनाच नावं ठेवायची, याला काय म्हणायचं? कलेविषयी लिहायचं सोडून आज राजकीय विषयावर का बोलतोय, म्हणून बुचकळ्यात पडलात ना?
काय झालं ते सविस्तरच सांगतो.

निमित्त झालं ते मुंबईत Nippon gallery मध्ये सध्या चालू असलेल्या चित्र प्रदर्शनाचं. प्रदर्शनाच्या टीजर मध्ये वासुदेव गायतोंडे आणि प्रभाकर बरवे यांचे फोटो आहेत. त्या फोटोंचा आणि प्रदर्शनात जी चित्रं मांडली आहेत त्यांचा संबंध काय हे कुठेही स्पष्ट केलेलं नाही.

प्रदर्शनाच्या ठिकाणी ते फोटो अगदी सुरुवातीलाच लावलेले आहेत. साहजिकच सर्वसामान्य कला रसिकांना इथे या दोन महान कलाकारांच्या संबंधी काहीतरी पाहायला मिळेल अशी अपेक्षा निर्माण होते आणि ते उत्सुकतेने येतात. आल्यावर त्यांना लक्षात येतं की या दोन फोटोंचा आणि प्रदर्शनाचा सुतराम संबंध नाही. परंतु त्यामुळे कोणी परत फिरत नाही. आलोच आहोत तर बघूया काय आहे ते असा विचार करून ते प्रदर्शन बघतात.

हाही प्रकार एकंदरीत ठीकच आहे असंही म्हणता येईल कारण सध्याच्या जाहिरातबाजी च्या युगात कुठलीही गोष्ट विकण्यासाठी जाहिरात करावी लागते आणि जाहिरात म्हटली की त्यात मोठमोठे सेलिब्रिटी आणावे लागतात. अगदी साध्या तेल साबणाच्या जाहिरातीत सुद्धा एखादा सुपरस्टार काम करतो. मग कलेच्या क्षेत्रातले सुपरस्टार असे दिसले तर आश्चर्य वाटायला नको. आश्चर्य नाही वाटत पण इथे मुद्दा वेगळाच आहे.

एकतर कलेच्या क्षेत्रातील हे दोन तारे आता हयात नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रतिमांचा वापर त्यांच्या संमती शिवाय केला जात आहे हे उघड आहे. परंतु खरी धक्कादायक आणि उद्वेगजनक बाब ही आहे की त्यांच्या प्रतिमांचा वापर जे करत आहेत त्यांना प्रत्यक्षात मात्र त्यांच्याविषयी आदर नाही. आदर नाहीच उलट हे जुने कलाकार आता चावून चोथा झालेले विषय आहेत, असे यांचे मत आहे. अशी दुटप्पी भूमिका बघून संताप येतो. थूक लगाना मना है असंच यांना सांगावंसं वाटतं.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.