No products in the cart.
राज्य कला प्रदर्शन (विद्यार्थी विभाग ) सांगता
दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी राज्य कला प्रदर्शन (विद्यार्थी विभाग) सांगता झाली. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृती प्रदर्शित झाल्या होत्या. नाशिकचे कला शिक्षक दीप ज्योती आहेर यांनी प्रदर्शनात कला शिक्षक आणि रसिक अशा दुहेरी रूपात भेट दिली. या प्रदर्शनाला मिळालेला प्रतिसाद, प्रदर्शनातील कलाकृती आणि आयोजनातील सकारात्मक, नकारात्मक बाबी याविषयी आहेर यांच्याशी संवाद साधला. या संवादावर आधारित प्रदर्शनाचा हा वृत्तांत. वाचकांनाही काही सुचवायचे असेल तर त्यांनी जरूर प्रतिक्रिया द्याव्या.
दरवर्षी राज्य कला प्रदर्शनाच्या आयोजनात भरपूर त्रुटी असतात. पण यंदाचे हे आयोजन तुलनेने अत्यंत नीटनेटके होते. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांकडून कला संचालनालयाने ऑनलाईन पद्धतीने कलाकृती मागवल्या होत्या, त्यामुळे निवडीच्या आधीच कलाकृती पाठवण्याचे जिकरीचे काम टळले. कारण निवड प्रक्रियेसाठी कलाकार ज्या कलाकृती पाठवत त्यांची संख्या मोठी असल्याने त्या पुन्हा विद्यार्थ्यांना परत पाठवण्यात खूप मोठा वेळ लागत असे आणि साहजिकच त्यात कलाकृतीना इजा पोहोचण्याची शक्यताही होती. ऑनलाईन प्रक्रियेमुळे केवळ निवडलेल्या कलाकृती पाठवल्या गेल्या आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांचा त्रास वाचला.
दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी विभागाचे हे प्रदर्शन आता वेगवेगळ्या शहरात आयोजित केले जाते, त्यामुळे वेगवेगळ्या शहरातील कला रसिकांनाही या प्रदर्शनाचे महत्त्व कळू लागले आहे. यंदाचे आयोजन हे पुण्यात झाले. कला रसिकांचा उत्तम प्रतिसाद या प्रदर्शनास मिळाला. विशेषतः शालेय विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनाला आले होते. आयोजनाची जागाही योग्य विचार करून निवडली होती. बिबवेवाडीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक सभागृहात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी प्रदर्शन आयोजनास मोठी जागा उपलब्ध झाली त्यामुळे आयोजनही चांगले झाले.
विद्यार्थ्यांचे काम उत्तम होते. विद्यार्थ्यांचं प्रदर्शन असल्यामुळे समकालीन कलेतील नवे प्रवाह इथे फारसे दिसून आले नाहीत तरी विद्यार्थ्यांचा प्रयत्न खूप छान होता. एकूण अनेक सुधारणांसहित हे प्रदर्शन झाल्याने कला शिक्षक म्हणून मला यंदाचे प्रदर्शन अधिक चांगले वाटले. पुढील प्रदर्शने ग्रामीण भागातही आयोजित व्हावीत जेणेकरून ग्रामीण भागातील कला रसिक आणि विद्यार्थीही कला चळवळीशी जोडला जाईल.
****
Related
Please login to join discussion