No products in the cart.
‘स्त्री चित्रकार’ पुस्तकाला पुरस्कार
साधना बहुळकर लिखित आणि राजहंस प्रकाशन प्रकाशित ‘बॉम्बे स्कूल कला परंपरेतील स्त्री चित्रकार’ या पुस्तकास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कै. कृष्ण मुकुंद स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. साधना बहुळकर या गेली ४० वर्षे कला क्षेत्राशी संबंधित आहेत. या क्षेत्रात काम करताना त्यांच्या असं लक्षात आलं की इतर ललित कलांच्या तुलनेत फाइन आर्ट क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या अत्यंत कमी आहे. २०१३ मध्ये दृश्यकला कोशाचे काम करताना या आकडेवारीला पुष्टीच मिळाली. असे का या प्रश्नाचे उत्तर शोधताना साधना बहुळकरांच्या मनात या पुस्तकाची कल्पना साकारली. या पुस्तकाची सुरुवात साधना बहुळकर यांनी एशियाटिक सोसायटीसाठी ‘रजनी दांडेकर’ फेलोशिप अंतर्गत ‘बॉम्बे स्कूलच्या स्त्री चित्रकार’ हा प्रबंध लिहिला तिथून झाली. पुढे राजहंस प्रकाशनाने या प्रबंधाचे रूपांतर ग्रंथात केले. १८५७ (जेजे स्कूल ऑफ आर्टची स्थापना) ते इस १९५० या मोठ्या कालखंडातील स्त्री चित्रकारांच्या कारकिर्दीचा आढावा या पुस्तकात आहे. या पुस्तकात बॉम्बे स्कूल कला परंपरेतील अँजेला त्रिंदाद, अंबिका धुरंधर, विमल भागवत गोडबोले, मारी हेंडरसन टेम्पल, मग्दा नाखमन आचार्य या पाच महत्वाच्या स्त्री चित्रकारांच्या कारकिर्दीचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अमृता शेरगील तसेच इतर महत्वाच्या स्त्री चित्रकारांच्या चित्र/शिल्पकला कारकिर्दीची माहितीही देण्यात आली आहे.
हा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांचे हस्ते देण्यात येईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद जोशी असून मोहन गुजराथी आणि नलिनी गुजराथी यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राहील. दि २४ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पुणे येथे असून कलारसिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा पत्ता:
ज्ञानप्रबोधिनी सभागृह, सदाशिव पेठ, पुणे – ४११०३०.
****
‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
Related
Please login to join discussion