No products in the cart.
जेजेत विद्यार्थी (की शिक्षक?) सरकारविरोधात संपावर!
आज दि १६ नोव्हेंबर पासून जेजे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी संपावर गेले आहेत. आज विद्यार्थी वर्गात बसून काम न करता संस्थेच्या आवारातच हाताला काळ्या फिती बांधून काम करणार आहेत. आज सायंकाळी ४ वाजता कला क्षेत्रातील काही (ज्येष्ठ?) व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली या संपाची पुढची दिशा ठरणार आहे असे जाहीर करण्यात आले आहे.
या संपामागे विद्यार्थ्यांच्या खालील प्रमुख मागण्या आहेत.
१. विद्यार्थ्यांना डिनोव्होबद्दल कुठलीही माहिती नाही. जेजेचं डिनोव्हो अभिमत विद्यापीठात रूपांतर झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर त्याचा काय परिणाम होईल याबद्दल विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. तेव्हा याबद्दल माहिती देण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.
२. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध नाहीत. तेव्हा या शिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी देखील विद्यार्थी करत आहेत.
३. विद्यार्थ्यांसाठी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. यामध्ये टॉयलेट, लाईट, पंखे या प्राथमिक सुविधा देखील जेजेमध्ये उपलब्ध नाहीत. त्याची पूर्तता तातडीने व्हावी अशी त्यांची मागणी आहे.
४. कम्प्युटर लॅब आणि इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध नाही. या साहित्याची देखील सोय तातडीने करावी अशी देखील विद्यार्थ्यांची मागणी आहे.
जेजेच्या परिसरात कानोसा घेतला असता असे कळले की विद्यार्थ्यांच्या या संपाला जेजे स्कूल ऑफ आर्ट मधल्याच काही प्रमुख शिक्षकांची – ज्यांचा डिनोव्होला विरोध आहे आणि डिनोव्होमुळे ज्यांना जेजेतली सुखाची नोकरी सोडून नागपूर किंवा औरंगाबादमध्ये जावे लागेल अशा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फूस लावून हा संप घडवून आणला आहे असे सांगितले जाते. यातील महत्वाची गोष्ट अशी की जेजे स्कूल ऑफ आर्टच्या कॅम्पसमध्ये असलेल्या जेजे आर्किटेक्चर आणि जेजे अप्लाइड आर्ट यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मात्र डिनोव्होला कुठल्याही स्वरूपाचा विरोध नाही. किंबहुना पाठिंबाच आहे. यासंदर्भात अधिक चौकशी केली असता असे कळले की, या दोन्ही महाविद्यालयांच्या प्राचार्य व शिक्षकांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना डिनोव्होचं महत्व समजावून सांगितलं होतं.
जेजे स्कूल ऑफ आर्टच्या अधिष्ठात्याने मात्र तसे काहीच न केल्यामुळे जेजे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आज रस्त्यावर आले आहेत. वास्तविक पाहता सध्या जेजेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर डिनोव्होमुळे कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही. किंबहुना झालाच तर त्यांचा भविष्यात मोठा फायदाच होणार आहे पण डिनोव्होला विरोध करायच्या नादात स्कूल ऑफ आर्टच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना अंधारात ठेवलं त्यामुळे विद्यार्थ्यांवर संपावर जाण्याची वेळ आली आहे. डिनोव्होला पाठिंबा असणारे शिक्षक आणि अधिकारी मात्र हे सरकारविरोधात घडवून आणलेलं आंदोलन आहे असं स्पष्टपणे सांगतात.
****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion