No products in the cart.
तर तुम्ही बरंच काही मिस कराल !
‘चिन्ह’चा ‘गच्चीवरील गप्पा’ हा कार्यक्रम पुन्हा सुरु होतोय. या कार्यक्रमाच्या नियोजनाचं काम माझ्याकडे असतं. तसं मी आधी प्रेक्षक म्हणून आणि आता नियोजक म्हणून गच्चीवरील गप्पा कार्यक्रमाचे अनेक भाग ऐकले आहेत. पण यंदाच्या १०१ व्या कार्यक्रमाचं आयोजन मला खूप समृद्ध करून गेलं. १०१ व्या कार्यक्रमाचे मानकरी आहेत चित्रकार सुनील गावडे. महाराष्ट्राची चार शासकीय कला महाविद्यालये आणि इतर खाजगी महाविद्यालये यातून दरवर्षी किमान दहा हजार चित्रकार पास होऊन बाहेर पडत असतील, पण यातील यशस्वी किती जण होतात तर हाताच्या बोटावर मोजण्याइतके. तर माणूस यशस्वी का होतो त्याचं कारण जाणून घ्यायचं असेल तर ‘चिन्ह’च्या यु ट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालेला हा ‘गच्चीवरील गप्पां’चा १०१ वा भाग जरूर पहा. या कार्यक्रमाची लिंक या लेखाच्या शेवटी दिली आहे.
सुनील गावडे हे चित्रकार म्हणूनच नाही तर माणूस म्हणून भन्नाट रसायन. कार्यक्रमाचं आयोजन करताना त्यांच्याशी संपर्क साधला असता ते पहिल्या वाक्यातच मला म्हणाले “कनक, आपण जे करायचं ते १०० टक्के देऊनच करायचं नाहीतर करायचं नाही”. या पहिल्या वाक्यातच मला कळलं की हा माणूस चित्रकार म्हणून का यशस्वी झाला आहे. यश हा शब्द छोटा होईल एवढं या माणसाचं अफाट कर्तृत्व आहे. व्हेनिस बिएनालेमध्ये आपली कलाकृती सादर करण्याचा मान सुनील गावडे यांना मिळाला आहे. खरं तर सुनील गावडे यांचा २०१० पर्यंतचा प्रवास ‘चिन्ह’च्या २००९ – १० सालच्या अंकात प्रदीर्घ लेखाच्या स्वरूपात प्रकाशित केला आहे. पण त्याच्यापुढे सुनील गावडे यांनी काय काम केलं हे जाणून घेण्यासाठी हा १०१ वा कार्यक्रम नक्की बघा.
चित्रकार म्हणजे रिऍलिस्टिक किंवा ऍबस्ट्रॅक्ट इथपर्यंत आपल्याला परिचय असतो. पण सुनील गावडे हे कायनेटिक शिल्प तयार करतात. कायनेटिक शिल्पं ही फिरती असतात. फिरती म्हणजे त्यात काहीतरी हालचाल असते. तंत्रज्ञानाचा वापर करून या शिल्पांना मुव्हमेंट दिली जाते. पण गावडेंची ही शिल्प नुसती मुव्हमेंट नाही तर प्रत्येक शिल्पामागे विशिष्ट विचार असतो, तत्वज्ञान असते. ते या कार्यक्रमात त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितले आहेच. पण त्याही पलीकडे सुनील गावडे यांना जी विचारांची बैठक आहे त्यामुळे त्यांचे प्रत्येक वाक्य आपल्याला काहीतरी शिकवते. अनेक चित्रकार स्किल्समध्ये तज्ज्ञ असतात, पण ते विचार मांडू शकत नाहीत. जे चित्रकार विचार मांडतात त्यांचं बोलणं, किंवा लिहिणं म्हणजे शब्दच्छल असतो. पण सुनील गावडे जे बोलतात ते अगदी सहज समजून घेता येतं. त्यांच्या प्रथमदर्शनी ऍबस्ट्रॅक्ट वाटणाऱ्या कलाकृतीचा अर्थ गावडेना ऐकलं की सहज समजतो. आणि आपण समृद्ध होतो. १२ वर्ष बॉंबे पोर्ट ट्रस्टमध्ये क्लेरिकल काम केल्यानंतर त्यांनी नोकरीला रामराम ठोकला आणि पूर्ण वेळ कला क्षेत्रात झोकून दिलं. यात त्यांच्या पत्नीचा – उषाचा पाठिंबा महत्वाचा होता.
ज्या प्रमाणात गावडे मराठी रसिकांपर्यंत पोहोचायला हवेत तेवढ्या प्रमाणात ते पोहोचले नाहीत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ते जे काही आपल्यापर्यंत पोहोचले ते ‘चिन्ह’च्या १२-१३ वर्षांपूर्वी आलेल्या अंकांमधूनच ! अर्थात जागतिक स्तरावर पोहोचलेल्या आणि आपल्या विशिष्ट अशा कला वर्तुळात राहणाऱ्या सुनील गावडेंना त्याची गरज नाही. पण ती गरज आपलीच म्हणजे कला विद्यार्थी किंवा सर्व सामान्य कला रसिक यांची आहे. कारण त्यांचं प्रत्येक वाक्य ही एका अर्थाने संतांची वाणी आहे. कला विद्यार्थी तर त्यातून शिकतीलच पण ज्याला आयुष्यात काहीतरी करायचंय किंवा नुसतं जीवनाचं सुंदर तत्वज्ञान जरी समजून घ्यायचंय त्याने हा ‘गच्चीवरील गप्पां’चा कार्यक्रम नक्की पहावा. नाहीतर तुम्ही निश्चितप्रमाणं खूप काहीतरी मिस कराल !
‘गच्चीवरील गप्पा’ हा कार्यक्रम खालील यु ट्युब लिंकवर क्लिक करून आपण बघू शकता.
Related
Please login to join discussion