No products in the cart.
जहांगिरमध्ये ‘ द स्पेक्ट्रम ऑफ कलर्स ‘ !
जहांगिर आर्ट गॅलरी मध्ये 10 समकालीन कलाकारांच्या चित्र व शिल्पकृतींच्या प्रदर्शनाचं आयोजन दि. 02 ते 08 मे 2023 दरम्यान करण्यात आलं आहे. या प्रदर्शनामध्ये लक्ष्मीनारायण शर्मा, ममता शर्मा, रुपेश पाटील, कुमार गायकवाड, राजू औताडे, कल्पना आर्य, चेतन वैती, वैभव गायकवाड, मकरंद जोशी, श्रेयस खानविलकर या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. हे प्रदर्शन रसिकांना सकाळी 11:00 ते सायंकाळी 07:00 वाजेपर्यंत पाहता येईल.
या प्रदर्शनाचं उद्घाटन दि 02 मे रोजी श्री. संदीप शुक्ला (जनरल सेक्रेटरी मुंबई काँग्रेस), श्री राजेंद्र पाटील (अध्यक्ष बॉम्बे आर्ट सोसायटी), सुकन्या मोने (अभिनेत्री), अंकुर कतटकर (दिग्दर्शक), अमीर तडवलकर (अभिनेता), सुचित्रा गोसावी (अभिनेत्री) यांच्या शुभहस्ते झाले.
लक्ष्मीनारायण शर्मा हे वास्तववादी शैलीत चित्र साकारतात. निसर्गचित्र आणि व्यक्तिचित्र रंगवण्यात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवलं आहे. ममता शर्मा या जेजे स्कूल ऑफ आर्टच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांच्या चित्रातून मानवी आकृत्यांचं अलंकारात्मक मोहक चित्रण रसिकांना पाहता येतं. तेजस्वी आणि आकर्षक रंगांचा वापर हे त्यांच्या चित्रांचं वैशिष्टय आहे. रुपेश पाटील हे वास्तववादी शैलीत काम करतात आणि पेस्टल व जलरंगांवर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे. रुपेश यांना त्यांच्या चित्रकलेतील योगदानाबद्दल प्रफुल्ला डहाणूकर अवॉर्ड मिळालं आहे.
कुमार गायकवाड हे भारतीय संस्कृतीला आपल्या विशिष्ट शैलीच्या माध्यमातून कॅनव्हासवर चितारतात. आकर्षक रंगांचा वापर आणि शैलीदार फॉर्म्स हे कुमार यांच्या चित्रांचं वैशिष्ट्य आहे. राजू औताडे हे प्रामुख्यानं ॲक्रिलिक माध्यमात काम करतात. विविध आकारांना लयबद्ध रीतीनं कॅनव्हासवर गुंफण करून ते आशयघन कलाकृती तयार करतात. बिंदूंचा शिस्तबद्ध आणि संयमित वापर हे औताडे यांच्या चित्रांचं वैशिष्टय आहे.
कल्पना आर्या यांना जुन्या शहरातील गल्ल्या आणि रस्ते नेहमीच प्रेरणा देत आले आहेत. कल्पना व रंगसंगती यांची उत्कृष्ठ सांगड घालून त्यातून आकर्षक असे सिटीस्केप्स तयार झाले आहेत. कल्पना यांच्या सिटीस्केप्स रसिकांना शहरांच्या सौन्दर्याशी नव्याने परिचय करून देतात. चेतन वैती हे कलात्मक पद्धतीने शिल्प तयार करतात. त्यांची शिल्पे म्हणजे पारंपरिक विषयांना दिलेला अद्भुत आकार होय. त्यांच्या शिल्पाकृती मध्ये प्रामुख्यानं घोडा हा विषय असून, त्याची विविध रूपे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांची शिल्पं ही रसिकांना आकर्षून घेतात.
वैभव गायकवाड हे आपल्या कलाकृतीमध्ये वैविध्यपूर्ण माध्यमांचा वापर करतात. तंत्रावर त्यांचं प्रभुत्व असल्यामुळे त्यांच्या कलाकृतीमधले वेगवेगळे प्रयोग नेहमीच रसिकांना आकर्षून घेतात. मकरंद जोशी यांची जलरंगांमधील निसर्गचित्रे प्रमाणबद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पर्स्पेक्टिव्हचं योग्य भान आणि रंगांचा तंत्रशुद्ध पद्धतीनं वापर यामुळे त्यांची चित्रे ओल्ड मास्टर्सच्या शैलीची आठवण करून देतात.
श्रेयस खानविलकर एकाच वेळी पारंपारिक , आधुनिक शिल्पकला अशा दोन्ही माध्यमात कलाकृती तयार करून रसिकांना थक्क करून सोडतात. कायनेटिक शिल्प हे नवमाध्यम श्रेयस खानविलकरांच्या विशेष पसंतीचे आहे.
Related
Please login to join discussion