No products in the cart.
- Home
- Uncategorized
- ‘जेजे जगी’ : ३०० पेक्षा अधिक पानं…
‘जेजे जगी’ : ३०० पेक्षा अधिक पानं…
‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ संदर्भात गेल्या चाळीस वर्षात मी अतिशय नकारात्मक लिखाण केलं. त्याचं मला अनेक वेळा वाईट देखील वाटतं. कलाक्षेत्रात भेटणारे अनेक लोकं सुरुवातीला मी केलेल्या जहाल टीकेमुळे बिथरुन गेलेले दिसत असत. त्यांच्याकडून सारखी विचारणा देखील होई की ‘तू हे का करतोस ? यातनं आपल्या जेजेची बदनामी नाही का होत ?’ त्यावर मी दिलेल्या उत्तरामुळे त्यांचं समाधान झाल्याचं फारसं दिसत नसे. आणि मी देखील ते व्हावं यासाठी फारसा प्रयत्न करीत नसे.
पण माझ्या लेखणीची धार जसजशी वाढत गेली तसतशी ही विचारणा कमी होत गेली. नंतर तर फक्त जेजेमधल्या काही शिक्षकांचाच या लेखनाला विरोध होऊ लागला. विशेषतः ‘कालाबाजार’ अंक ज्यावेळी प्रसिद्ध केला तेव्हा तो विरोध खूपच वाढला होता. इतका की काही जेजेच्या काही माजी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना धमक्या देखील दिल्या गेल्या. ” ‘चिन्ह’चा अंक वाचताय, काय परीक्षेत पास व्हायचंय ना ?” वगैरे. पण मी या अशा धमक्यांकडे दुर्लक्ष कारणंच पसंत केलं.
‘चिन्ह’ न वाचल्यामुळं त्या विद्यार्थ्यांचं निश्चितपणानं नुकसान झालं असणार. पण त्याहीपेक्षा जास्त नुकसान हे त्या शिक्षकांचं झालं असणार हे मी अगदी खात्रीनं सांगू शकतो. कारण ते शिक्षक नंतर कलाक्षेत्रात कधी दिसलेच नाहीत. लेखन करणं, विचार मांडणं, भाषण देणं, परिसंवादात किंवा मोठ्या मोठ्या प्रदर्शनात सहभागी होणं सोडाच साध्या चित्रप्रदर्शनांना देखील ते कधी दिसलेच नाहीत. जणू काही जेजेमध्ये ते शिक्षक म्हणून लागले होते तो केवळ एक अपघात असावा. ते सारेच शिक्षक आज पूर्णतः विस्मरणात गेले आहेत.
हे सारं आज आठवलं, कारण आज मी ‘जेजे जगी’ ग्रंथाची ओळख करून देणारी पोस्ट लिहितो आहे. आणि ती लिहीत असताना आधी देखील आणि आताही अनेक नव्या वाचकांनी विचारणा केली आहे की, या ग्रंथात ‘कालाबाजार’ अंकात प्रसिद्ध झालेले लेख देखील असणार आहेत का ? तर या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असं आहे. ( अपवाद फक्त भानू अथैया, विद्या चव्हाण, संदीप कुलकर्णी, अमिता खोपकर आणि सुभार्या पळशीकर यांच्या जेजेमधील आठवणींच्या लेखांचा ) ‘कालाबाजार’ अंकच नाही तर जेजे संदर्भात मी गेल्या तीस वर्षात वेळोवेळी वृत्तपत्रात जे नकारात्मक लेखन केलं ते या ग्रंथात कुठंही घेतलेलं नाही. या ग्रंथात जे लेखन आहे ते प्रामुख्यानं जेजेच्या रम्य आठवणींवर आधारित असलेलंच आहे. नकारात्मक लिखाण आवर्जून टाळलेलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी या ग्रंथाविषयी जाणून घेतल्यानंतर या संदर्भात एक अत्यंत महत्वाची सूचना केली. ते म्हणाले ‘जेजेविषयीच्या तुझ्या भावना मी समजू शकतो. नको टाकूस तू ते लिखाण या ग्रंथात, पण पहिली बातमी दिल्यापासून आजतागायत जे काही घडलं ते मात्र तूच लिहायला हवं. आणि ते या ग्रंथात यायलाच हवं. ते मुख्य ग्रंथात यायला नको असं जर तुला वाटत असेल तर ‘गायतोंडे’ ग्रंथासोबत जशी तू एक विशेष पुरवणी पुस्तिका दिलीस तशी या ग्रंथासोबत द्यायला काय हरकत आहे ?’ केतकर यांच्या म्हणण्यात तथ्य होतं. त्यांच्या सोबत काम करण्याचा योग कधी आला नाही पण त्यांनी जेजे संदर्भात अनेक लेख माझ्याकडून हक्काने लिहून घेतले ही गोष्ट मात्र खरी आहे. त्यांनी वेळोवेळी दिलेल्या बातम्यांमुळेच खरं तर जेजे आज आहे त्या जागी टिकून राहिलं आहे ही वस्तुस्थिती आहे. अन्यथा राज्यकर्त्यांनी ते उचलून देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर नेऊन ठेवण्याची सर्व जय्यत तयारी केलीच होती की. मला ती बातमी कळताच मी ती लागलीच फोनवरुन केतकरांच्या कानावर घातली त्यांनी देखील क्षणार्धातच मला त्याची बातमी देण्याची सूचना केली.
त्यावेळी केतकर लोकसत्तेचे संपादक होते. दुसऱ्या दिवशी लोकसत्तेच्या पहिल्या पानावर ती बातमी झळकताच प्रचंड गदारोळ झाला. चित्रकार प्रभाकर कोलते आणि असंख्य विद्यार्थ्यांना घेऊन जेजेत थडकले. स्वतंत्रपणे देखील अनेक माजी विद्यार्थी तिथं आले आणि ऐतिहासिक डीन बंगलो ऐराच्या कार्यालयासाठी ताब्यात घेऊन मुहूर्ताचा नारळ फोडण्यासाठी हारतुरे, नारळ, पेढे, मिठाई घेऊन जमलेल्या पासलकर नावाच्या गृहस्थांना आणि त्यांच्या आचरट सहकाऱ्यांना पूजेचं सारं सामान तिथंच टाकून तिथून अक्षरशः पोबारा करावा लागला. बातमीचा दणका इतका जबरदस्त होता की, त्यानंतर मात्र कुणाची जेजेच्या इमारतीकडे किंवा त्या परिसराकडे बघण्याची हिंमत झाली नाही हे खरं. म्हणूनच मी त्याचं सारं श्रेय केतकर यांना देतो. त्यामुळेच त्यांनी दिलेली सूचना मी लागलीच मान्य केली. ती मान्य करताना त्यांना मी एक छोटीशी अट मात्र घातली. ती अशी की या ग्रंथासाठी प्रस्तावना मात्र तुम्हीच लिहायची. आणि त्यांचा मोठेपणा हा की त्यांनी ती लागलीच मान्य देखील केली. मधल्या काळात ग्रंथाचं काम खूपच लांबलं. कोरोना लॉकडाउनने तर दोन वर्ष वायाच गेली पण या काळात हा ग्रंथ जास्तीत जास्त समृद्ध कसा करता येईल ? जास्तीतजास्त माजी सेलेब्रिटी विद्यार्थ्यांची आत्मकथनं कशी मिळवता येतील याकडे मी अधिक लक्ष पुरवलं. त्यामुळेच मुळात ठरलेल्या दोनशे पानांत तब्बल शंभर ते सव्वाशे पानांची भर पडली आहे. आता हा ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’वरचा हा ग्रंथ अतिशय ऐतिहासिक दस्तावेज ठरला. तर त्याच मला आश्चर्य वाटणार नाही.
खरं तर आजच्या पोस्टमध्ये या ग्रंथात सहभागी झालेल्या लेखक चित्रकारांची यादी द्यायची होती. पण जेजेचं नाव निघालं की मी भान विसरतो आणि भरकटत सुटतो. तसंच आज देखील झालं आहे. ती यादी आता उद्या देईन. हा ग्रंथ प्रकाशित होईपर्यंत जवळ जवळ रोजच मी तुमच्याशी संवाद साधेन म्हणतोय. पाहूया !
*****
– सतीश नाईक,
संपादक, चिन्ह
Related
Please login to join discussion