No products in the cart.
कालाय तस्मै नमः
हे जे गेट दिसतंय, ते आहे चेंबूरच्या हायवे सोसायटीचं. याच सोसायटीत चित्रकार प्रभाकर बरवे राहत असत. बरवे १९९५ साली गेले तेव्हा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी तिथं जाणं झालं होतं. त्यानंतर बहुदा २००७ किंवा २००८ साली पुन्हा एकदा तिथं जाणं झालं होतं ते बरवे यांच्या डायऱ्या पाहण्यासाठी. त्यानंतर तिथं कधी गेलोच नाही. खरं तर तिथून दीड – दोन किलोमीटर अंतरावर माझं जुनं घर आहे. पण तरीही तिथं काही जाणं झालं नाही हेच खरं. त्यानंतर जवळ जवळ चौदा वर्षांनी काल तिथं गेलो होतो.
किती बदललं आहे सारं ? सारा पाणथळ भाग तर तो होता. पाहावं तिथं पाणी आणि चिखल. पावसाळ्यात तर एखाद्या धरणाजवळ आपण आलोत की काय असं वाटायचं. काल बघितलं तर सारं गायब झालं होतं सगळीकडे नुसत्या इमारतीच दिसत होत्या. क्षणभर मला वाटलं की आपण पत्ता चुकलोय की काय ? म्हणून मग ज्या मित्राकडे जायचं होतं त्या मित्राला फोन केला. तर तो म्हणाला तू आलायस बरोबर फक्त एक गल्ली चुकलायस. आधीच्या गल्लीत शिरलायस. दुसऱ्या गल्लीत शिर. तसं केल्यावर रस्त्याच्या टोकाला आलो तो थेट हायवे सोसायटीसमोरच.
बरवे यांच्याकडे यायचो ते सारे दिवस मला आठवले. घरातून निघालो की साधारण पंधरा वीस मिनिटातच बरवे यांच्या घरी पोहोचत असे. सिटीआयचं मैदान, प्रियदर्शनी इमारत तेव्हा इतकी प्रकाशझोतात आली नव्हती. पण त्यांच्याकडे जातानाच माझं आकर्षण असायचं ते वेगळंच. चुनाभट्टी आणि कुर्ल्याला दुभंगणाऱ्या त्या कृत्रिम डोंगरावरुन आरसीएफकडे एक मालगाडी जात असे. ती त्या पुलावरुन जाताना पाहण्याचा अनुभव काही वेगळाच होता. बरवे यांनी आपल्या चित्रात त्या मालगाडीचं ड्रॉईंग अतिशय यथार्थपणे रेखाटलं आहे.
आता मात्र ते रेल्वेरूळ, कृत्रिम डोंगर, चुनाभट्टी आणि कुर्ल्याला विभागणारा तो पूल हे सारंच झोपडपट्टी आणि भली थोरली होर्डिंग यांनी झाकून टाकलं आहे. आरसीएफला जाणारी ती गाडी आता जाते की नाही तेही आता कळत नाही. आणि बरवे यांना विचारावं म्हटलं तर बरवे यांना जाऊन आता सत्तावीस अठावीस वर्ष झाली आहेत.
****
– सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion