No products in the cart.
‘हेमांगी’मध्ये उमा कुलकर्णी यांचा चित्र प्रवास
यंदाच्या हेमांगी दिवाळी अंकात ज्येष्ठ साहित्यिक आणि चित्रकार उमा कुलकर्णी यांनी आपल्या चित्रकलेतील प्रवासावर लेख लिहिला आहे. आपण सगळेच उमाताईंना कन्नड मधील एस. एल. भैरप्पा, शिवराम कारंथ, गिरीश कर्नाड यांच्या उत्तमोत्तम साहित्यकृतींना मराठीमध्ये अनुवादित करण्यासाठी ओळखतो. पण हा लेख वाचून उमाताईंनी चित्रकलेचे रीतसर शिक्षण घेतले आहे आणि त्या चित्रही काढतात हे नव्यानेच कळते. उमाताईंना चित्रकलेमध्ये लहानपणापासूनच आवड आणि गती होती. पण त्यांनी ते कधी गंभीरपणे घेतलं नाही. पुढे एसएनडीटी महाविद्यालयातून चित्रकलेत त्यांनी एमए पूर्ण केलं त्यानंतर चित्रकलेमध्ये काम सुरु केलं.
बेळगावमधले ज्येष्ठ चित्रकार कुसनूर यांचे उमाताईंना मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर प्रभाकर कोलते, सुचिता आणि शरद तरडे या चित्रकारासोबतच्या वेळोवेळी होणाऱ्या चर्चेतून उमाताईंची चित्रशैली स्वतंत्रपणे विकसित झाली. उमाताई प्रामुख्याने अमूर्त शैलीत काम करतात. यामागचं कारण या लेखात वाचायला मिळेल. चित्रकलेत एमए करत असताना उमाताईंना क्रिएटिव्ह लँडस्केप आणि क्रिएटिव्ह स्टील लाईफ हे चित्र आवडत होते. कारण यामध्ये कलाकाराला मिळणार स्वातंत्र्य. या रंग आणि फॉर्मच्या स्वातंत्र्यामुळेच उमाताई अमूर्त शैलीकडे वळल्या.
एकदा कौटुंबिक भेटीत उमाताईंनी प्रभाकर कोलते यांना आपली चित्रं दाखवली आणि विचारलं की, “मी चित्र काढत राहू का?” यावर कोलते सरांनी दिलेलं उत्तर सर्वच चित्रकारांसाठी महत्वाचं आहे, “कुणी सांगत म्हणून कधीच चित्र काढू नका, स्वतःला वाटतं म्हणून चित्रं काढा. आणि आपली चित्र नेहमी भिंतीवर फ्रेम करून ठेवा. वारंवार पाहिल्याने तुम्हाला आपल्या चित्रातले गुण दोष कळतील आणि आपल्या चित्रांकडे अलिप्तपणे पाहण्याची दृष्टी विकसित होईल.”
चित्रकार ज्योत्स्ना कदम यांना उमाताई भेटल्या तेव्हा ज्योत्स्ना कदम उमाताईंना म्हणाल्या की, “तुम्ही आमच्यासारख चित्रकलेचं पाच वर्ष शिक्षण घेतलं नाही म्हणून तुमचा कलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन फ्रेश आहे आणि ते खूप महत्वाचं आहे.” अनेक जण जे चित्रकलेचं रीतसर शिक्षण घेत नाहीत पण चित्र काढू इच्छितात त्यांच्यासाठी हा खूप सकारात्मक सल्ला आहे. ज्योत्स्ना कदम यांच्याशी झालेल्या भेटीनंतर उमाताई पेंटिंग करण्यासाठी उद्युक्त झाल्या.
या लेखात जरी उमाताईंचा चित्रकला प्रवास शब्दबद्ध केलेला असला तरी, सर्वच उदयोन्मुख चित्रकारांसाठी हा लेख दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.
येत्या दहा तारखेपासून उमाताईंच्या चित्रांचं प्रदर्शन सुदर्शन कला दालन, पुणे येथे आयोजित करण्यात आलेलं आहे. आवर्जून हे प्रदर्शन बघा.
****
Related
Please login to join discussion