No products in the cart.
विष्णू आणि ज्योत्स्ना सोनवणे जहांगीरमध्ये
विष्णू आणि ज्योत्स्ना सोनवणे या चित्रकार दाम्पत्यांचे ‘कॉन्फ्लुएन्स’ हे समूह चित्र प्रदर्शन मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरी येथे दि 04 एप्रिल ते 10 एप्रिल 2023 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. कला निर्मिती चित्रकाराला नेहमीच नवीन शक्यतांचा आनंद देते. त्यामुळे विष्णू सोनवणे नेहमीच प्रयोगशील चित्र निर्मिती करतात. आकार आणि मानवी आकृत्यांची लयबद्ध गुंफण करून चित्र निर्मिती करणे ही विष्णू सोनवणे यांनी चित्र शैली आहे. विविध आकार कॅनव्हासवर लयबद्ध शैलीत मांडल्यानंतर सोनवणे सध्या मिथककथा प्रयोगात्मक स्वरूपात कॅनव्हासवर चित्रित करत आहेत. प्रस्तुत प्रदर्शनात त्यांची ही नवी चित्रं रसिकांना बघता येतील. पुराणकथेतील विविध देवतांना त्यांनी एका वेगळ्या दृष्टिकोनांनी चित्रित केले आहे. एकप्रकारे हा मूर्त अमूर्तचा तात्विक संगम आहे. सोनवणे यांनी या चित्रांमध्ये शांत आणि मधुर रंगसंगती वापरली आहे ती चित्रांचे तात्विक महत्व अजून वाढवते. थोडक्यात विष्णू सोनवणे यांनी चित्रे रसिकांना पारंपरिक प्रतिकाना नव्या दृष्टीने बघण्याची प्रेरणा देतात.
ज्योत्स्ना सोनवणे यांच्यासाठी त्यांची चित्रे ही अंतर्मनातून प्रकट होतात. ज्योत्स्ना यांचे चिंतन आणि जीवनविषयक विचार यातून या चित्रांची निर्मिती होते. चित्रकार कुटुंबाचा भाग असल्यामुळे त्या सतत चित्रांच्या सोबत असतात. चित्रांची ही सोबत त्यांना चित्रनिर्मितीसाठी प्रेरित करत गेली आणि ज्योत्स्ना यांनी आपली स्वप्ने, विचार, प्रेरणा, आठवणी यांना कॅनव्हासवर साकार करण्यास सुरुवात केली. ज्योत्स्ना प्रामुख्याने अमूर्त शैलीत चित्र निर्मिती करतात. त्यांच्या चित्रातील अमूर्त आकार आणि रेषा यांची प्रेरणा मात्र मूर्त निसर्ग असतो. ज्योत्स्ना उत्स्फूर्तपणे अंतरप्रेरणेतून चित्र निर्मिती करत असल्या तरी रसिकांना कलेचा, चित्रांचा निखळ आनंद देणे ही त्यांच्या चित्र निर्मितीची प्रमुख प्रेरणा असते.
विष्णू आणि ज्योत्स्ना सोनवणे यांचे हे प्रदर्शन सकाळी 11 ते संध्याकाळी 07 वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले राहील.
*****
Related
Please login to join discussion