No products in the cart.
विवान सुंदरम यांचे निधन
प्रख्यात चित्रकार, लेखक आणि चळवळीतले कार्यकर्ते विवान सुंदरम यांचं आज सकाळी ०९.२० ला त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. विवान सुंदरम हे अमृता शेरगील यांचे भाचे होते. १९४३ मध्ये सिमला येथे सुंदरम यांचा जन्म झाला. बडोद्याच्या सयाजीराव विद्यापीठात त्यांनी चित्रकलेचं शिक्षण घेतलं. पुढे लंडनच्या स्लेड स्कूलमध्येही त्यांनी कला शिक्षण घेतलं. १९७० मध्ये ते भारतात परत आले. सुरुवातीच्या काळात ते केवळ कॅनव्हासच्या माध्यमातून कलानिर्मिती करत असत. १९९० पासून त्यांनी विविध माध्यमांना सक्रियपणे हाताळण्यास सुरुवात केली. यामध्ये शिल्प, इन्स्टॉलेशन, फोटोग्राफी, व्हिडीओ अशा विविध माध्यमात त्यांनी कला निर्मिती केली. त्यांची कामे जगभरात प्रदर्शित झाली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी चित्रकारांच्या अनेक कार्यशाळा, कला प्रकल्प तसेच प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं.
शेरगील कुटुंबाचे सदस्य असल्याने त्यांनी ३० वर्ष शेरगील प्रकल्पाचं काम पाहिलं. शेरगील प्रकल्पाचं काम करताना त्यांनी संयोजक, कलाकार, संपादक, पुरालेख शास्त्रज्ञ अशा विविध भूमिका निभावल्या. ‘अमृता’ या नावाने त्यांनी अमृता शेरगील यांची फोटोग्राफी आणि पेंटिंग या माध्यमांचा मिलाफ साधून केलेली चित्र मालिका जगभर गाजली होती.
विवान सुंदरम यांचा सामाजिक चळवळीतही सक्रिय सहभाग होता. डॉक्युमेंटेशनच्या माध्यमातून त्यांनी चित्रकलेसाठी मोठ्या प्रमाणात संदर्भ साहित्यही लिहिलं होतं. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वातील एक द्रष्टा चित्रकार आपल्यातून निघून गेला आहे. चिन्ह आर्ट न्यूजतर्फे विवान सुंदरम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
*****
Related
Please login to join discussion