No products in the cart.
छत्रपती संभाजीनगर कॉलेजचे प्रदर्शन कधी ?
जेजे स्कूल ऑफ आर्टचे प्रदर्शन सुरु झाले. ते चोवीस मार्च पर्यंत वाढवण्यात आले आहे. जेजे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टचे प्रदर्शन होऊन जमाना झाला. नागपूरच्या शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचे प्रदर्शन २१ मार्चला संपणार आहे. अनेक खाजगी महाविद्यालयांच्या प्रदर्शनांचीही सांगता झाली, असे असले तरी छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचे प्रदर्शन कधी होणार हा प्रश्न कला वर्तुळातून उपस्थित झाला आहे. मार्च महिना अर्धा संपला तरी या महाविद्यालयाच्या प्रदर्शनाच्या आयोजनाची माहिती अजून आलेली नाही. कॉलेजच्या काही शिक्षकांनी अशी माहिती दिली की हे प्रदर्शन २८ मार्च ला आयोजित करण्यात येईल. खरं तर सर्वच कला महाविद्यालयांनी फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपली प्रदर्शनं आयोजित करणं अपेक्षित असतं. कारण पुढे लगेचच परीक्षा येत असतात. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय महाविद्यालयात सेमिस्टर पध्द्त लागू असल्याने तर हे प्रदर्शन लवकर होणे हेच विद्यार्थ्यांच्या हिताचे होते.
यासंदर्भात महाविद्यालयाचे डीन प्रा. रमेश वडजे यांना अधिक माहिती विचारली असता त्यांनी, यावर्षी प्रदर्शनाच्या आयोजनात अनेक बदल केले असल्यामुळे प्रदर्शन आयोजनास वेळ लागत आहे अशी माहिती दिली. यावर्षी सर्व विद्यार्थ्यांची सर्वांच्या सर्व कामे न लावता निवडक कलाकृती प्रदर्शित करण्यात येतील. असे केल्यामुळे विद्यार्थ्यांचे उत्तम निवडक काम पाहुण्यांना बघता येईल. यापूर्वी विद्यार्थ्यांचे सर्व काम लावल्याने पाहुण्यांचा खूप वेळ प्रदर्शन बघण्यात जात असे आणि चांगल्या विद्यार्थ्यांच्या कामाला न्याय मिळत नसे. त्यामुळेच हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
“यावर्षी प्रदर्शनात कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी अधिकाधिक कंपन्यांना आमंत्रित करण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न आहे, ज्यामध्ये केवळ अप्लाइड आर्टच नाही तर टेक्स्टाईल, पेंटिंग याविषयाच्या विद्यार्थ्यांनाही प्लेसमेंट आणि ट्रेनिंग मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. काही कंपन्यानी यासाठी सकारात्मक सहमतीची दर्शविली आहे. या सगळ्याचे योग्य नियोजन व्हावे म्हणून प्रदर्शन आयोजनास वेळ लागत आहे.” अशी माहिती डीन वडजे यांनी दिली.
“याशिवाय टेक्सटाईल विभागाची जुनी इमारत मोडकळीस आल्याने तिचे पाडकाम सुरु होते. ते आता पूर्ण झाले आहे आणि ती जागा बक्षीस वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मोकळी करण्यात आली आहे. या कामास काही कालावधीची गरज असल्याने प्रदर्शन आयोजनास वेळ लागला. आता आमच्या आयोजनासंबंधी बैठका सुरु असून लवकरच प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल” अशी माहिती प्रा. वडजे यांनी दिली.
****
Related
Please login to join discussion