News

ओळखा पाहू ते मंत्री कोण ?

अमीर खाँ साहेबांचा स्मृतिदिन मध्यप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. मग सरकार भाजपचं असो वा काँग्रेसचं. मध्यप्रदेशकडून बोध घ्यावा अशी काही तिथली सांस्कृतिक परिस्थिती नाही. असं असलं तरी मोठ्या कलावंतांचे स्मृतिदिन, प्रदर्शनं तिथं भव्य प्रमाणावर आयोजित केली जातात. भोपाळ बिएनालेला आज पूर्वीचं आकर्षण राहिलेलं नाही. पण कोणे एके काळी भारताच्या सर्वच राज्यातील चित्रकार या बिएनालेकडे लक्ष ठेऊन असतं ही वस्तुस्थिती आहे. मध्यप्रदेशच नव्हे तर भारतातील साऱ्याच राज्यांना महाराष्ट्राच्या मॉडेलचं कौतुक होतं.

बाबुराव सडवेलकर सेवानिवृत्त झाले आणि एकाहून एक नामचीन ( नामचीन हा शब्द सराईत गुंडांसाठी वापरला जातो याची आम्हाला कल्पना आहे.) रत्ने कला संचालकपदावर आरुढ झाली आणि कोणे एकेकाळी भारतातील सर्व राज्यात सर्वश्रेष्ठ ठरलेल्या महाराष्ट्राच्या कला संचालनालयाची पुरती धूळधाण झाली. ती  होण्यात अर्थातच राजकारणी कारणीभूत होते हे वेगळं सांगावयास नकोच. कला संचालनालयाची किती लक्तरे  निघाली आहेत हे गेल्या दोन आठवड्यापूर्वी  झालेल्या राज्य कला प्रदर्शनाच्या उद्धघाटनातून दिसलंच. 

कालच्या पोस्ट मध्ये सदर प्रदर्शनाच्या निमंत्रण पत्रिके विषयी लिहिले होते. फडतूस डीटीपी ऑपरेटरने ती निमंत्रण पत्रिका तयार केली असेल तर त्या विषयी आम्हाला काहीच म्हणायचे नाही. पण कला संचालनालयाच्या अखत्यारीत असलेल्या कला महाविद्यालयातील शिक्षकांकडून जर हे डिझाईन करुन घेतले असेल तर काय लायकीचे शिक्षण महाराष्ट्रात दिले जात असेल याची सहज कल्पना येते. 
 
पाच लाखाचा गायतोंडे पुरस्कार प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांना दिला गेला. पण त्या पुरस्काराची काय किंमत निमंत्रण पत्रिकेत केली आहे ते मुद्दाम पहा. पुरस्कार समारंभाची ओळ दिसेल न दिसेल अशा पद्धतीने छापून कला संचालनालयातल्या अधिकाऱ्यांनी ना गायतोंडे याना किंमत दिली ना राम सुतार यांना. चटावरचं श्राद्ध उरकल्या सारखा हा समारंभ उरकला गेला असं समारंभाला उपस्थित असलेले सारेच सांगतात. 
 
पुढला किस्सा तर आणखीनच भयानक आहे. खरं तर हा गायतोंडे पुरस्कार हा राम सुतार यांना गेल्या वर्षीच मिळायचा, पण एका मंत्र्याने नाक खुपसलं आणि तो पुरस्कार समारंभ बारगळला गेलाच. कलेतील ‘क’ देखील समजवायची कुवत नसलेल्या त्या मंत्र्याला निवड समितीने निवड केलेल्या शिल्पकार राम सुतार यांना तो द्यायचा नव्हता. का तर म्हणे ‘तो मोदींचा माणूस आहे.’ ( ‘मोदींचा माणूस’ का तर जगातलं सर्वात उंच असं सरदार पटेलांचं ‘शिल्प’ त्यानं केलं आहे म्हणून.) भाजप शिवसेना भांडण तिथे देखील उपटलं. या मंत्री महोदयांना तो पुरस्कार ठाकरेंचा म्युझियम समोरचा ‘पुतळा’ ज्यानं केला त्या शिल्पकाराला द्यायचा होता. या वादावादीत गायतोंडे  पुरस्कार बारगळला तो बारगळाच. जे काही लिहिले आहे त्यात अवाक्षर ही असत्य नाही. त्या मंत्र्याला नंतरच्या काही दिवसातच भाजपच्या मांडवाखाली जावंच लागलं. आता तिथं तो शांतपणे आपले ‘उद्योग’ करतो आहे. 
‘रंग अमीर’ कार्यक्रम पत्रिका.
इथं हे असं चाललंय आणि तिकडं मध्यप्रदेशात अमीर खाँ साहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ मोठा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित करुन सरकार थांबलेलं नाही तर देशभरच्या ८४ चित्रकार, शिल्पकारांच्या कलाकृतीचं एक मोठं प्रदर्शन इंदोरच्या  देवळालीकर कला विथिका मध्ये भरवून मोकळं झालं आहे. त्यात महाराष्ट्रातील असंख्य कलावंतांना देखील निमंत्रित करण्यात आलं आहे. आता बोला !   
****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.