No products in the cart.
जेजेत का येत नाही ?
नितीन केणी यांनी फेसबुकवर प्रतिक्रिया दिली आहे की ‘ तू जेजेत व्यक्तिशः का येत नाहीस ?’ वगैरे, नितीन आणि मी जेजेत एकाच वेळी शिक्षण घेतलं. मी इंटेरियर करीत होतो तेव्हा तो सिरॅमिक करीत होता. त्यानंतर तो जेजेमध्येच लागला आणि सिरॅमिक शिकवू लागला. सेवानिवृत्त झाल्यावर पुन्हा तो जेजेमध्ये शिकवू लागला आहे असं कळतं. तो जुना मित्र असल्यामुळं त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं भाग आहे. त्यामुळे मला देखील लिहिण्याची एक अधिक संधी मिळते आहे ते वेगळंच.
नितीन. मी जेजेमध्ये येत नाही याचं कारण स्पष्ट आहे की तिथे आता माझ्या परिचयाचे कोणी उरलेले नाहीत. अनिल नाईक होता तोपर्यंत मी तिथे येत होतो. नंतर मात्र मी तिथे फिरकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी तिथे कधीच येत नाही. शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी जेव्हा मी गॅलरीला येतो तेव्हा आवर्जून जेजेला भेट देतोच. तिथे आलो म्हणजे नंतर केक किंवा बनमस्का खाण्यासाठी कयानीला भेट ही असतेच. किंवा बादशहाचा फालुदा खाण्यासाठी हटकून क्रॉफर्ड मार्केटला जातोच. पूर्वी चहा घ्यायचो तेव्हा जेजे समोरच्याच जुन्या दुकानातून लोपच्यू चहा आठवणीं घेऊन जायचो. लक्ष्मण होता तेव्हा कॅन्टीनला भेट हटकून असायचीच. शिवाय शहा अँड सन्सला अधनंमधनं भेट ही असतेच. आणखीन अशा बऱ्याच आठवणी जेजेशी निगडित आहेत. पण साऱ्याच सांगणं योग्य नाही. चाळीस बेचाळीस वर्ष झाली जेजे सोडल्याला पण मुंबईत आलो की संध्याकाळी जेजेत ऐकू येणारा कावळ्यांचा कलकलाट ऐकायला आवर्जून कधी मधी जेजेत येतोच.
इतर दिवशी मात्र मी जेजेमध्ये येत नाही याची कारणं तुला ठाऊकच आहेत. ज्या लोकांनी जेजे संस्कृती उद्धवस्त केली. त्यांची तोंडं देखील मला पाहायची नसतात म्हणूनच मी कार्यालयीन वेळात जेजेत येत नाही. पण जेजेत घडणाऱ्या घटना मला लगेचच कळत असतात. तसं मी माझंच नेटवर्क तयार केलं आहे. त्यामुळेच मी इतक्या बेधडकपणे लिहू शकतो. पत्रकारिते मधल्या अनुभवामुळेच मी हे करु शकतो हे उघड आहे. या परिसरात वावरणाऱ्यांना ज्या बातम्या ठाऊक नसतात त्या मी देतो हे तू देखील मान्य करशील. हे कधीतरी लिहायचंच होतं. तू कंमेंट केली म्हणून लिहिलं इतकंच. ‘डिनोव्हो’ची प्रक्रिया पूर्णत्वाला जाईल तेव्हा मी जेजेत आवर्जून येईन तेव्हा भेटूच.
– सतीश नाईक,
संपादक, चिन्ह
***
Related
Please login to join discussion