No products in the cart.
“गायतोंडे” का वाचायचं ? ( भाग २ )
चित्रकार गायतोंडे हा ‘चिन्ह’साठी सदासर्वकाळ चालणारा विषय आहे. विशेषतः ‘गायतोंडे’ ग्रंथाचं काम जेव्हापासून सुरु झालं तेव्हापासूनच म्हणजे २००८ सालापासूनच हा विषय डोक्यात खोलवर जाऊन बसला आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे गायतोंडे यांची पेंटिंग्ज आणि त्यांचं लोकविलक्षण जगणं.
साहजिकच ग्रंथ प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजे २०१६ सालापासून सतत या ग्रंथाविषयी विचारणा होत असते आणि वाचकांकडून सातत्याने मागणीही असते. गायतोंडे यांची चित्रं पाहताना सतत काहीतरी नवं गवसत राहतं. जे तुम्हाला विचार करायला भाग पाडत. गेल्या आठवड्यात ‘गायतोंडे’ ग्रंथाच्या संपादकीयातले दोन परिच्छेद आम्ही पोस्ट केले आणि त्या पोस्टला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. हा सारा प्रकार आम्हाला अनपेक्षित होता. बघता बघता ही पोस्ट दहा
हजारपर्यंत ‘रिच’ झाली. म्हणूनच ‘गायतोंडे’ ग्रंथाच्या त्या संपादकीयाचे पुढील दोन परिच्छेद इथं देत आहोत.
” त्या कॅनव्हाससमोरून तुम्ही दूर होता तेव्हा विलक्षण शांततेच्या एका स्निग्ध अनुभवासोबत तुम्हाला बरंच बरंच बरंच काही गवसलेलं असतं. तुम्ही कलावंत असाल तर ज्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात त्यात काही तरी लोकविलक्षण करून दाखवण्याविषयीच्या टोकाच्या उत्कट भावना तुमच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतात. तुम्ही कलावंत नसलात तरी ज्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात त्या क्षेत्रात उतुंग असं काही तरी करून दाखवण्याविषयीच्या भावना, एका विलक्षण शांततेसोबत तुमच्या मनात प्रबळ पावू लागलेल्या असतात किंवा अगदी तुम्ही सर्वसामान्यांपैकी एक जरी असलात आणि आपल्यातल्या संवेदनशीलतेला तुम्ही अद्यापि नाहीसं होऊ दिलं नसेल तर त्या चित्रानं तुमच्या आतपर्यंत कुठतरी खोल खोल अशी एक निरव शांततेची भावना निश्चितपणानं निर्माण केलेली असते. आणि मग हा सारा विस्मयचकीत करणारा अनुभव तुमच्याकडून शब्दबद्ध होतो तो ‘आवडलं पण कळलं नाही किंवा भावलं पण उमगले नाही’ या किंवा अशा शब्दांत, असाच काहीसा शब्दांच्याही पलीकडला असा तो विलक्षण अनुभव असतो.
जर थोडासाच विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की, चित्रांनाही आशय असतो. आणि एखाद्या कवितेच्या, कथेच्या कादंबरीच्या किंवा एखाद्या नाटक अथवा चित्रपटाच्या आशयापेक्षा हा आशय अगदी सर्वथा वेगळा असतो. आणि तो तुम्हाला चित्राच्या अगदी प्रथम दर्शनातच सहजगत्या त्यातनंच दृगोच्चर होत होत अलगद अलवार भिडतो. भिडावा लागतो. किंबहुना चित्रात नेमकं काय पहायचं असतं या ज्ञानाचं सम्यक दर्शनच तो घडवून जातो, चित्राच्या दृश्यात्मकतेविषयीची आपली जाणीव प्रगल्भ करतो. चित्रातून शाब्दिक, पुस्तकी ग्रांथिक, बटबटीत ढोबळ अर्थ अथवा संदर्भ शोधायचे नसतात.
प्रतिमा, प्रतीक, प्रमेयं, ढोबळ शब्दार्थ यांच्याही पलीकडे चित्रकलेचं जग असतं म्हणून अभिव्यक्ति प्रगटीकरणात चित्रकला ही कला सर्वश्रेष्ठ मानली जाते. त्याच्याही पल्ल्याड जाऊन चित्रांना खराखुरा दृश्यात्मक अर्थदेखील प्राप्त करून देत येतो हे आपल्याला गायतोंडे यांच्यासारख्या चित्रकाराच्या चित्रासमोर उभं राहिल्यावरच उमगतं.”
( बहुचर्चित ‘नग्नता’ अंकाची किंमत रु ७५० तर कुरियर खर्च १०० रु आहे. पण ८५० रुपयात आम्ही बहुचर्चित ‘गायतोंडे’ ग्रंथाची जनआवृत्ती ( किंमत रु ५०० ) आणि ‘चित्रसूत्र’ ( किंमत रु १०० ) असे १३५० रु किंमतीचे साहित्य फक्त ८५० रुपयात देऊ केलं आहे. कृपया सवलत योजनेचा त्वरित फायदा घ्या.
( सोबतच्या फोटोंमध्ये त्याचे पोस्टर जोडले आहे. ते पाहा आणि त्वरित मेसेज करा. )
******
– सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion