No products in the cart.
“गायतोंडे” का वाचायचं ? ( भाग ३ )
‘शब्दांच्या पलीकडले’ या ‘गायतोंडे’ ग्रंथाच्या संपादकीयाचा हा तिसरा भाग. आम्ही संपादकीय क्रमशः देण्यास सुरुवात केली तर त्याला वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. म्हणूनच हे संपादकीय आणखीन चार पाच भागामध्ये संपूर्ण देणार आहोत.
हा ग्रंथ प्रकाशित झाला २०१६ साली आणि आज २०२३ साल चालू आहे. या आठ वर्षात ‘गायतोंडे’ ग्रंथातला कुठलाच भाग शिळा झालेला नाही हेच यातून स्पष्ट होतं. याला कारण आहे ते चित्रकार गायतोंडे यांचं लोकविलक्षण जगणं. अशी व्यक्तिमत्व शतकात खूपच कमी जन्मतात. चित्रकार गायतोंडे हे त्यापैकी एक. २००१ साली या जगातून निघून जाताना त्यांनी नंतरच्या पिढ्यांपुढे आपल्या जगण्यानं आव्हानं निर्माण करुन ठेवली होती. त्यातलं एक आव्हान होतं त्यांच्याविषयीचा चरित्र ग्रंथ तयार करण्याचं. आपल्या पश्चात चित्रांखेरीज त्यांनी काहीही ठेवलं नव्हतं. बहुसंख्य कलावंत वृत्तपत्रात आलेल्या आपल्या मुलाखती, बातम्या, चित्र प्रदर्शनांचे कॅटलॉग, चित्रांची समीक्षा इत्यादी गोष्टींची कात्रणं काढून निगुतीने जपून ठेवत असतात. पण गायतोंडे यांनी यापैकी काहीही केलेलं नव्हतं. आणि लग्न बिग्न या भानगडीत ते कधी पडलेच नाहीत. साहजिकच त्यांच्या कुटुंबीयांनी देखील हे सारं जपून ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र त्यांच्या सख्ख्या बहिणीने भावाची आठवण म्हणून काही कात्रणं जमवून ठेवली होती. पण ‘चिन्ह’नं मात्र १९७५ सालापासून गायतोंडे यांच्या संदर्भात प्रसिद्ध झालेलं बहुसंख्य लेखन संग्रहित केलं होतं. त्याचाच वापर करुन ‘चिन्ह’नं ‘गायतोंडे’ ग्रंथ प्रसिद्ध केला.
आज आठ वर्षानंतर देखील त्या ग्रंथाला वाचकांकडून सतत मागणी आहे. या ग्रंथात गायतोंडे यांच्या संदर्भातल्या सर्वच महत्वाच्या घटनांची ज्यांना गायतोंडे यांचा सहवास लाभण्याचं भाग्य मिळालं अशांनी अतिशय प्रभावी पद्धतीनं नोंद करुन ठेवली असल्यानं हा ग्रंथ कुठल्याही पानावरुन वाचायला सुरुवात केली तरी तो शेवटपर्यंत वाचल्याशिवाय हातातून खाली ठेववत नाही, हा असंख्य वाचकांचा अनुभव आहे. या अनुभवात सहभागी व्हायचं असेल तर संपादकियाचा तिसरा भाग अवश्य वाचा आणि फोटोंमध्ये दिलेल्या माहिती पत्रकाचा वापर करुन या ग्रंथाची प्रत अत्यंत सवलतीत घरपोच मागवा.
“अगदी काल परवापर्यंत या साऱ्या संकल्पनांकडे काहीसं अविश्वासानं, अवहेलनेनं पाहिलं जात होतं. पण आंतरराष्ट्रीय लिलावांच्या आकडेवाऱ्या एकापाठोपाठ एक अशा जाहीर होऊ लागल्या आणि अविश्वास आणि अवहेलनेची जागा आधी कुतुहलानं घेतली आणि नंतर कौतुकानं. ग्युगेनहाईम म्युझियमच्या रिट्रॉस्पेक्टिव्ह शोनं तर या साऱ्याला जगमान्यताच दिली. जगभर २४ तास चालणाऱ्या वृत्त वाहिन्यांमधल्या जगातल्या नामवंत कला अभ्यासकांनी तर त्यावर शिक्कामोर्तबच केलं आणि कालपरवा पर्यंत भारतीय कला वर्तुळातील इन्यागिन्या लोकांनाच ठाऊक असलेलं चित्रकार वासुदेव संतू गायतोंडे यांचं नाव जगभरात पोहोचलं, इतकंच नाही तर भारतात देखील २३ कोटी आणि ७० लाख या जादूई संख्येनं ते अक्षरशः कर्णोपकर्णी केलं. इतक्या दिवसांत आपल्याला उमगलेलं सारं आज जागतिक पातळीवर मान्यता पावू लागलं आहे याचा आनंद अवर्णनीय होता. पण तोपर्यंत संपूर्णतः संन्यस्त वृत्तीनं आयुष्य ‘जगलेले गायतोंडे’ कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता अंगीकारलेलं कार्य आयुष्यभर एखाद्या व्रतस्थाप्रमाणे करीत राहिल्यास अंतिमतः (कदाचित मृत्युनंतर देखील) यशप्राप्ती ही होतेच असा काहीसा लोकविलक्षण संदेश देत परत न येण्याच्या वाटेनं कधीच निघून गेले होते. मला भावलेलं, जाणवलेलं हे सारं किंवा गायतोंडे यांची ही अलौकिक थोरवी साऱ्या जगाला कळायला हवी होती असं मला अगदी आतून, मनापासून वाटलं. तसं ते मला १९७४-७५ सालापासूनच जेजेच्या भिंतीवर त्याचं पेंटिंग पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच जाणवलं होतं; पण कुणीच ती जबाबदारी स्वीकारेना. म्हणून मग ‘चिन्ह’चे तीन विशेषांक काढून गायतोंडे यांच्या विषयीची सारीच्या सारी संदर्भ साधनं मी जगासमोर आणली. पण तरीदेखील कुणी गायतोंडे यांच्यावरच्या पुस्तक वा ग्रंथाचा विषय काढीना. म्हणून मग २००७ साली त्याच्या प्राथमिक कामाला सुरुवात केली आणि २०११ साली ज्या ग्रंथाची घोषणा केली तोच हा ग्रंथ.”
( बहुचर्चित ‘नग्नता’ अंकाची किंमत रु ७५० तर कुरियर खर्च १०० रु आहे. पण ८५० रुपयात आम्ही बहुचर्चित ‘गायतोंडे’ ग्रंथाची जनआवृत्ती ( किंमत रु ५०० ) आणि ‘चित्रसूत्र’ ( किंमत रु १०० ) असे १३५० रु किंमतीचे साहित्य फक्त ८५० रुपयात देऊ केलं आहे. कृपया सवलत योजनेचा त्वरित फायदा घ्या. ( सोबतच्या फोटोंमध्ये त्याचे पोस्टर जोडले आहे. ते पाहा आणि त्वरित मेसेज करा.
Related
Please login to join discussion