No products in the cart.
आता तृतीय व चतुर्थ कर्मचारी देखील जेजे रसातळाला नेणार !
‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’च्या कॅम्पस मधील द्वितीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांनी आज चक्क ‘स्पोर्टस डे’ साजरा केला असल्याची बातमी आहे. या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना त्यांनी जे जे कला महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनाच नव्हे तर दस्तुरखुद्द कलासंचालकांना देखील दिली नव्हती असे कळते. खरं तर असा प्रकार यापूर्वी कधीही जेजेत घडल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे संबंधित अधिष्ठाता आणि अधिकारी मात्र हडबडून गेल्याचे कळते.
कला संचालनालयातील मुख्य अधिकाऱ्यांना मंत्रालयाचे काहीतरी तातडीचे काम करावयाचे होते, म्हणून ते कर्मचाऱ्यांचा शोध घेऊ लागले तेव्हा म्हणे कुठे त्यांना कॅम्पस मध्ये असा ‘स्पोर्ट्स डे’ साजरा होत असल्याचे कळले. याचाच अर्थ असा की संबधित कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या संघटनेने आपण असा ‘स्पोर्ट्स डे’ साजरा करत आहोत याची कुठलीही पूर्वसूचना अधिकाऱ्यांना दिली नव्हती. गेले तीन दिवस जी लेखमाला आम्ही लिहीत आहोत त्यात जेजेचे आणि कला संचालनालयाचे किती अध:पतन झाले आहे त्याची विविध उदाहरणे देत आहोत. तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आमचे निरीक्षण किती अचूक आहे याचेच जणू दर्शन आज घडवले आहे.
हे सर्व कर्मचारी म्हणे ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’च्या अर्धी भिंत बांधलेल्या मैदानात एकत्र आले. तिथे त्यांनी क्रिकेटची मॅच वगैरे घेतली. मोठं मोठ्याने लाऊड स्पीकर लावून सामन्याचे धावते समालोचन देखील साजरे केले. खरं तर हा शैक्षणिक परिसर आहे, मागच्या बाजूला पोलीस कमिशनरचं कार्यालय आहे, इतकंच नाही तर मागे हॉस्पिटल देखील आहे,असं असताना लाऊड स्पीकरवर अचकट विचकट गाणी लावून त्यांनी शैक्षणिक परिसरातील शांतता नियमांचा देखील भंग केला. लाऊड स्पीकर लावण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणेची किंवा पोलिसांची परवानगी घेतली होती का ? या विषयी देखील अनेक विद्यार्थी प्रश्न विचारीत होते. पण जिथे दस्तुरखुद्द संचालकानाच धाब्यावर बसवले आहे, तिथे पोलिसाना कोण भीक घालतो ?
गेल्या पंचवीस वर्षात ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चं व्यवस्थापन कसं रसातळाला गेलं आहे याचंच दर्शन घडविणारा हा सर्व घटनाक्रम आहे. आता शिक्षण सचिवांकड़े तक्रार गेल्याचे कळले आहे.त्यावर आता ते काय कारवाई करतात का साबळे यांच्या सारख्याना जसे मोकळे सोडले आहे तसेच यांनाही ते आता मोकळे सोडणार का ते आता पाहायचे.
****
Related
Please login to join discussion