No products in the cart.
ये कौन चित्रकार है ?
दि २८ ते ३१ मार्च २०२३ या दरम्यान शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर यांचं वार्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. कला वर्तुळात जी कुजबुज सुरु आहे त्यावरून असं कळतं की काल दुपारी उशिरापर्यंत या प्रदर्शनाची आमंत्रण पत्रिकाच तयार नव्हती. ‘चिन्ह’नं जेव्हा बातमी दिली तेव्हा बहुदा घाईगडबडीत ही पत्रिका तयार करण्यात आली असावी.
ही पत्रिका तयार करणाऱ्या डिझायनरला डिझाईन क्षेत्रात अलाइनमेंटचा जो बेसिक नियम असतो तोही माहित नसावा हे खरोखरच विद्यार्थ्यांचं दुर्देव आहे. वर महाविद्यालयाचं नाव दिलं आहे. अजिंठ्याची सुर सुंदरी तर एका कोपऱ्यात पार वर जाऊन बसली आहे.
पुन्हा कला प्रदर्शन व स्नेहसंमेलन ही ठळक नावं. साधा ‘संमेलन’ हा शब्द ‘सम्मेलन’ असा लिहिलाय तेही पाहा. मराठी भाषिक म्हणवता, कला महाविद्यालयात शिकवता आणि मराठीचं जुजबी ज्ञान देखील असू नये ही खरंच शरमेची गोष्ट आहे. पाहुणे आणि अधिष्ठात्यांची नावं राईट अलाईन आहेत की लेफ्ट हा प्रश्नच आहे. समजा ती सेंटर अलाईन असतील तर त्याच्या वरच्या तीन ओळी या राईट अलाईन का ? ज्यांनी हे डिझाईन केलंय ते कुठून शिकून आलेत असं समजायचं ? निमंत्रण पत्रिका लिहिणाऱ्यांना साधा ‘ही’ हा शब्द देखील ऱ्हस्व लिहायचा का दीर्घ लिहायचा हे देखील कळू नये ही खरंच आत्यंतिक शरमेची गोष्ट आहे. (ऱ्हस्व म्हणजे पहिली आणि दीर्घ म्हणजे दुसरी, हे आपलं साधं सोपं ज्ञान सहज जाताजाता)
त्यानंतर महाविद्यालयाप्रमाणेच अधांतरी लटकणारं महाविद्यालयाचं आवाहन. मग मधेच सेंटर अलाईन केलेलं प्रमुख पाहुण्यांचं नाव ( कला महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला कायम पोलीसच का प्रमुख पाहुणे असतात हा अनेकांना पडलेला खूप मोठा प्रश्न आहे.) आणि आमंत्रकांचं नाव. त्याच्या खाली दोनदा शासकीय महाविद्यालयाचा नाव – पत्ता. एवढ्याशा पत्रिकेवर छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख चक्क तीन वेळा.
खरं तर मराठवाडा क्षेत्रातील एवढं मोठं हे शासकीय कला महाविद्यालय. यांना साधी पत्रिकाही नीट तयार करता येत नसेल तर प्रदर्शन कसं असणार हे त्यावरुन लगेचच कळतं. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारे शिक्षकच असं पाट्या टाकणारं काम करत असतील तर विद्यार्थ्यांना काही येत नाही म्हणून दोष कसा द्यायचा ? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ? एखादा टिनपाट डीटीपी ऑपरेटरही यापेक्षा चांगली पत्रिका तयार करेल.
ज्या प्रदेशात हजारो वर्षांपूर्वी जगातला आश्चर्यांपैकी एक ठरावं अशी लेणी खोदली गेली. त्या प्रदेशातल्या कला महाविद्यालयातील शिक्षक जर अशी डिझाईन करत असतील तर खरोखरच मराठवाड्याचं हे दुर्दैव आहे. बाकी सरकारी कला महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला कुणाची निवड करावी, चोरांची का पोलिसांची हा ज्याच्या त्याच्या मगदूमाचा प्रश्न आहे. त्यावर आम्ही काही आणखीन टीका करू इच्छित नाही.
*****
Related
Please login to join discussion