No products in the cart.
‘युगवाणी’चा कोलते विशेष अंक !
नागपूरच्या विदर्भ साहित्य संघातर्फे ‘युगवाणी’ हे त्रैमासिक प्रसिद्ध केलं जातं. कोणे एके काळी प्रख्यात कवी ग्रेस हे या अंकाचं संपादन करीत असत. एकाहून एक सुरेख अंकांनी त्याकाळी ‘युगवाणी’नं जाणकारांची वाहव्वा ! मिळवली होती. प्रख्यात कवी प्रफुल्ल शिलेदार यांनी या अंकाच्या संपादनाची सूत्र हाती घेतल्यापासून ग्रेस यांनी ‘युगवाणी’ला जो दर्जा प्राप्त करून दिला होता त्याची जाणकारांना आठवण व्हावी अशा प्रकारचेच अंक प्रसिद्ध केले आहेत यात शंकाच नाही.
अगदी अलीकडं ‘युगवाणी’नं प्रख्यात चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या वरचा एक विशेष अंक प्रसिद्ध केला आहे. मुखपृष्ठावर कोलते यांचं रंगचित्र घेऊन आलेल्या या अंकात कोलते यांची पाच चित्रं रंगीत स्वरुपात प्रसिद्ध केली आहेत. चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या कर्तृत्वाचा विविध अंगानं आढावा घेणारे जयंत भीमसेन जोशी, अरविंद हाटे, अर्चना दीक्षित आपटे यांचे लेख या अंकाचं विशेष आकर्षण ठरावं. प्रभाकर कोलते यांच्या काही रेखाटनांसोबत कोलते यांच्या काही कविता देखील या अंकात प्रसिद्ध केल्या आहेत.
सर्वात महत्वाचं म्हणजे प्रख्यात पाश्चात्य चित्रकार पॉल गोग्या यांच्यावर चार्ल्स गोऱ्हाम यांनी ‘द गोल्ड ऑफ देअर बॉडीज’ नावाची जी गाजलेली कादंबरी लिहिली होती तिच्या कोलते यांनी केलेल्या मराठी अनुवादाचा काही भाग देखील या अंकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. मौज प्रकाशनातर्फे लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या या मराठी अनुवादासाठी लेखिका कमल देसाई यांनी जी प्रस्तावना लिहिली आहे तिचा समावेश देखील या अंकात करण्यात आला आहे. या प्रस्तावनेमुळे या अंकानं वेगळीच उंची गाठली आहे यात शंकाच नाही. या अंकाची किंमत १०० रुपये आहे. टपाल खर्च ३० रुपये आकारला जातो. हा अंक मिळवण्यासाठी कृपया ७७०९०४७९३३ या व्हाट्सअप नंबरवर मेसेज करावा .
******
Related
Please login to join discussion