News

‘युगवाणी’चा अरुण कोलटकर विशेषांक !

प्रख्यात उपयोजित चित्रकार आणि कवी अरुण कोलटकर यांच्यावर विदर्भ साहित्य संघाच्या नियतकालिकानं म्हणजे ‘युगवाणी’ या अंकानं एक विशेषांक प्रसिद्ध केला आहे. तब्बल २०० पानांच्या या अंकात सुधीर रसाळ, वसंत पाटणकर, नीतीन रिंढे, रणधीर शिंदे, मिहीर चित्रे, अशोक शहाणे, वसंत दत्तात्रय गुर्जर, वृंदावन दंडवते, विकास गायतोंडे, अरुण खोपकर, निशिकांत ठकार या मराठी भाषिक साहित्यिकांखेरीज सीतांशु यशश्चंद्र, ई. व्ही. रामकृष्णन, अरविंद कृष्ण मेहरोत्रा, अरुण कमल, हेमांग अश्विनकुमार या अन्य भारतीय भाषांतील लेखकांसोबतच ग्युन्थर झोंथायमर, जोवान्नी बांदिनी, लेटिशिय झेक्किनी, दावीद पुविग या परदेशी लेखकांनी अरुण कोलटकर यांच्या साहित्यासंदर्भात लिहिलेले लेख प्रकाशित केले आहेत.

प्रख्यात कवी, लेखक प्रफुल्ल शिलेदार यांनी संपादित केलेला आणि नामवंत छायाचित्रकार संदेश भंडारे यांचं मुखपृष्ठ लाभलेला हा अंक अतिशय संग्राह्य आहे. या अंकाची किंमत आहे रुपये २०० ( अधिक टपाल खर्च रु. ४० ) हा अंक मिळवण्यासाठी ‘सना पंडित, व्यवस्थापक युगवाणी द्वारा विदर्भ साहित्य संघ, सांस्कृतिक संकुल, झाशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर, ४४० ०१२’ या पत्त्यावर संपर्क साधावा. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे ७७०९० ४७९३३ .

अरुण कोलटकर यांच्या कवितांची पुस्तकं किंवा त्यांच्यावरचे अंक चटकन उपलब्ध होत नाहीत. किंबहुना वाचकांच्या त्यांच्यावरील प्रेमामुळं ती हातोहात संपून जातात. ‘चिन्ह’नं देखील २००५ साली एक विशेषांक प्रसिद्ध केला होता, ज्यात त्यांच्या अगदी जवळच्या चित्रकार स्नेह्यानं म्हणजे उपयोजित चित्रकार रत्नाकर सोहोनी यांनी लिहिलेला एक प्रदीर्घ लेख आम्ही प्रसिद्ध केला होता. सोहोनी यांनी त्यावेळी सदर लेखावर लेखक म्हणून आपलं नाव टाकू नये अशी सक्त ताकीद दिली होती, तिचा मान राखून आम्ही त्या लेखावर त्यांचं नाव टाकलं नव्हतं किंवा सतत विचारणा होऊन देखील आम्ही ते जाहीर देखील केलं नव्हतं. अलीकडेच रत्नाकर सोहोनी यांचं निधन झालं. म्हणूनच त्यांची क्षमा मागून आता त्यांचं नाव जाहीर करीत आहोत.

अरुण कोलटकरांचं चित्रकलेतलं कर्तृत्व रेखाटणाऱ्या या लेखाला देखील वाचकांचा अफाट प्रतिसाद लाभला होता आणि तो अंक हातोहात संपून गेला होता, पण तरीही नंतर देखील असंख्य वाचक या अंकाविषयी विचारणा करीतच होते. तसे या अंकाबाबतही होऊ नये याच उद्देशानं आम्ही ‘चिन्ह’तर्फे हा अंक लगेचच विकत घेण्याचे आवाहन करीत आहोत. कारण नंतर तो मिळणार नाही. तो मिळावा यासाठी संपादक प्रकाशकांचा अक्षरशः पिच्छा पुरवला जातो. ते जर टाळायचे असेल तर कृपया वरील दूरध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.