No products in the cart.
- Home
- Uncategorized
- ‘काळ्या निळ्या रेषा’ आत्मचरित्राला पुरस्कार
‘काळ्या निळ्या रेषा’ आत्मचरित्राला पुरस्कार
चित्रकार राजू बाविस्कर अनेक महत्वाच्या पुस्तकांचे मुखपृष्ठ चित्रकार म्हणून आपल्याला परिचित आहेत. नुकताच त्यांच्या राजहंस प्रकाशित ‘काळ्या निळ्या रेषा’ या आत्मचरित्राला संभाजीनगर येथील मराठवाडा साहित्य परिषदेचा ‘यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. २०२३ सालच्या या पुरस्कारासाठी प्रा. जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली मसापने राजू बाविस्कर यांच्या या आत्मचरित्राची निवड केली आहे. हा पुरस्कार दि १२ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजता मसापच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात साहित्यिक डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात येईल.
राजू बाविस्कर यांची चित्रं ही कॅनव्हासच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषितांचे जीवन आपल्यासमोर मांडतात. बाविस्कर यांच्या चित्रांची शैली ही वेगळी आहे त्यामध्ये सामाजिक भाष्य असले तरी स्वतंत्र चित्रकृती म्हणूनही त्यातील चित्रतंत्रामुळे ही चित्रे आपल्याला ओढून घेतात. चित्रांच्या माध्यमातून समाजातले टोकदार बोचरे वास्तव मांडणाऱ्या राजू बाविस्कर यांचे हे आत्मकथन लेखणीच्या माध्यमातूनही तितक्याच सशक्तपणे सामाजिक वास्तव मांडते.
हे आत्मकथन एक व्यवस्था समोर ठेवते. गावातली व्यवस्था, शोषण, निसर्ग, शिवार अशा सर्व गोष्टींचा समावेश यात आहे. शोषण व्यवस्थेचे चित्रण असूनही आत्मचरित्रातील नायक कुठेही सुडाची भाषा बोलत नाही पण तो समतेबद्दल खूप आग्रही आहे. हे आत्मकथन म्हणजे लेखकाच्या आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्तींच्या आठवणींचा संग्रहही आहे आणि सोबत लेखक चित्रकार म्हणून कसा घडत गेला याची कथाही आहे.
सध्या हे आत्मचरित्र साहित्य वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहे. अनेक वृत्तपत्रांनीही राजू बाविस्कर यांच्या या आत्मचरित्राची दखल घेतली आहे. ‘मसाप’ पुरस्काराच्या निमित्ताने एका चित्रकाराच्या साहित्यकृतीला विशेष सन्मान मिळतो आहे हे चित्रकला क्षेत्रासाठी आनंदाची गोष्ट आहे.
****
‘काळ्या निळ्या रेषा’ हे आत्मचरित्र खरेदी करण्यासाठी लिंक :
Related
Please login to join discussion