News

अमूर्ततेला अनुभवताना…

अमूर्त चित्रकलेबद्दल आपल्या समाजात अनेक गैरसमज रुळलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणूस अमूर्त चित्रांकडे बघताना संभ्रमात असतो. ही नक्की कला आहे का? इथपासून, यात काय बघायचं? याचा अर्थ काय आणि तो कसा शोधायचा? या चित्रांना शीर्षक का नसतं? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात असतात. परंतु या प्रश्नांची उत्तरं देणारं कोणी क्वचितच असतं. तसंच प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रानुसार त्याची विशिष्ट विचारसरणी तयार झालेली असते, तिचा चश्मा लावून अमूर्त चित्रं बघितली जातात. या सगळ्यामुळे अमूर्त चित्रांचा अनुभव आणि आस्वाद योग्य प्रकारे घेतला जात नाही. मराठी साहित्य विषयाच्या प्राध्यापिका आणि रेडिओ जॉकी डॉगौरी कुलकर्णी यांनी लिहिलेला अमोल पालेकर यांच्या जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये भरलेल्या चित्र प्रदर्शनासंबंधीचा लेख सर्वसामान्य कला रसिकांच्या मनात असलेल्या अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

———-

आपल्याही नकळत आपण अनेक ग्रह करून घेतलेले असतात. त्यापायी चौकटी चौकटीमध्ये स्वतःला कोंबून जगण्याची आपल्याला सवय होऊन गेलेली असते. रूळलेली वाट, ठरलेला मार्ग, ‘पूर्णत्वाचा ध्यास’, अतीव परिचयाचं, माहितीचं असं सगळं आपल्याला हवंहवंसं वाटतं.

पण या सगळ्या ठरलेल्या, रुळलेल्या सवयी आपल्याला कितीतरी न रूळलेल्या, काहीशा गूढ, चौकटी पलीकडल्या (आणि म्हणूनच फार सहज अशा गोष्टींवर दुर्बोधतेचा आरोप केला जातो.) गोष्टींना समजून घेण्यापासून, अनुभूती घेण्यापासून दूर करत जातात. एखादी गोष्ट पूर्ण होण्यातला आनंद, समाधान शोधण्याची नकळत सवय लागलेल्या मनाला जेव्हा ‘भग्नतेतही अपूर्णतेचं सौंदर्य असतंच’ हे विधान वाचायला मिळतं तेव्हा ते क्षणार्धात तुमच्या मनाचा ताबा घेतं.

सध्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुरू असलेल्या अमोल पालेकर यांच्या अमूर्त शैलीतील चित्रशृंखलेच्या प्रदर्शनाच्या (‘through the radiance’) निमित्ताने त्यांनी लिहिलेल्या लेखात मी ‘भग्नतेतही अपूर्णतेचं सौंदर्य असतंच’ हे वाक्य वाचलं. एकूणच जीवनातली आणि चित्रकलेतली अमूर्त शैली याविषयी फार सुरेख लिहिलंय. त्यानंतर मी त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन पाहून आले. सगळी चित्रं मनात साठवून ठेवायला मला दोन भेटी लागल्या.

असं म्हणतात ना की कुठल्याही नवीन गोष्टीला समजून घेण्याची सुरुवात सुद्धा परिचिताच्या आधारानेच होत असते. ज्याला आपण ‘ज्ञाताकडून अज्ञाताकडे’ जाणं असं म्हणतो.

तुम्ही जेव्हा काहीएक सलग वर्षं एका विशिष्ट विषयाच्या अभ्यासात स्वतःला गुंतवून घेता तेव्हा त्यानंतर जे तुम्ही आत्मसात करता ती तुमची भाषाच बनून जाते. तुमच्याही नकळत. पीएच डी चा अभ्यास करत असताना हातात आलेला ‘संरचनावाद’ हा हळूहळू इतका मुरत गेला की त्या आधी एखाद्या पुस्तकाचं वाचन करणारी मी आणि त्या नंतरची ‘मी’ यांच्यात बराच फरक पडला.

संरचनावादाच्या चौकटी माझ्याही नकळत मनात फिट्ट होऊन गेल्या आणि त्यानंतर फक्त साहित्यकृतीच नाही तर कुठलीही कलाकृती पहात असताना, समजून घेत असताना; मग ते एखादं नाटक असेल, चित्रपट असेल किंवा मग एखादं चित्र असेल माझ्याही नकळत त्या कलाकृतीतून व्यक्त होणाऱ्या अर्थाला शक्य करणाऱ्या संकेतांचा शोध सुरू होतो.

साहित्याचा अभ्यास करत असताना अभ्यासलेले वेगवेगळे सिद्धांत, संकल्पना कधी डोकं वर काढतील आणि तुमच्या समोर येऊन प्रश्न विचारून तुम्हाला भंडावून सोडतील याचा काही नेम नसतो.

आता हा एक ग्रह की ‘अमूर्तता’ ही मुळातच स्वतःभोवती काहीसं गूढतेचं, दुर्बोधतेचं वलय घेऊन येत असते. पण आज असं वाटतंय की बरेचदा दुर्बोधता ही त्या कलाकृतीत नसतेच मुळी तर ती आपणच आपल्याला लावलेल्या सवयींची मर्यादा असते. कुठल्याही गोष्टीला पाहताक्षणी समजून घेण्याची, अर्थ लावण्यासाठी धडपडण्याची, अनोळखीपणाला ओळखीचं करून घेण्याची आणि म्हणूनच निराकारतेत परिचयाचे आकार शोधण्याची आपल्याला उगाचच सवय आणि घाई लागलेली असते. आपल्या मनाची हीच मर्यादा कदाचित आपल्याला त्या अमूर्ततेतलं सौंदर्य शोधण्यापासून, अनुभवण्यापासून काहीशी दूर घेऊन जाते.

गेले दोन दिवस ती सगळी चित्र पाहत असताना अभ्यासलेल्या, वाचलेल्या कितीतरी संकल्पना उगाचच डोकी वर काढत होत्या. उदाहरणार्थ, ‘आदि-मध्य-अंत’.

कॅनव्हासवरची ती संरचना पाहत असताना मनात आलं की तिच्या निर्मितीची सुरुवात कुठून झाली असेल? कुठल्या रंगापासून? मध्य कुठला? आणि शेवट? मुळात या चित्राला शेवट आहे का? त्या कॅनवासपुरती तिची सांगता कुठे झाली असेल?

आणि मग ते एकेक चित्र अंशाअंशाने, मग थोडं दूर जाऊन पूर्ण डोळ्यात साठवत असं वेगवेगळ्या बाजूने पाहताना मजा आली. कारण मुळात नजरेला किंवा मनाला या प्रश्नांची उत्तरं नकोच होती. कारण ती न शोधण्यात, न मिळण्यातच त्या अमूर्ततेला अनुभवण्याची गंमत आहे. अमूर्ततेमध्ये सामावलेली अर्थांच्या शक्यतांची अमर्यादितता आहे हे जाणवत होतं.

जशी ‘नियमरहित नियमितता’ तशीच कॅनव्हासच्या मर्यादित अवकाशातली ही अर्थाच्या शक्यतांची अमर्याद क्षमता ते प्रत्येक चित्र दाखवत होतं. समोर दिसणारे पॅटर्न्स, आकार; त्यामध्ये ओळखीचं, सवयीचं असं काहीही शोधण्याची मन डोळ्यांना परवानगी देत नव्हतं आणि तरीही ते पाहत रहावसं वाटत होतं. अगदी कानाकोपऱ्यातून.

अर्थात हे सगळं आता इथेच थांबून चालणार नाही.

कुठलीही कलाकृती निर्माण करण्यासाठी किंवा तिचा आस्वाद घेण्यासाठी रियाज फार गरजेचा असतो. तसंच या ही बाबतीत नजरेला, मनाला ही अमूर्तता अनुभवण्याचा रियाज सतत करत राहायला हवा. तेव्हाच पालेकर सर म्हणतात तशी नजरेला ‘भग्नतेतल्याही अपूर्णतेचं सौंदर्य’ अनुभवण्याची सवय होईल.

 

गौरी कुलकर्णी

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.