News

चित्र-संगीत विठ्ठल दर्शन !

आषाढी एकादशीच्या निमित्तानं ‘भक्तीरस’ हा अनोखा कार्यक्रम काल मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यमंदिर इथं सायंकाळी पार पडला. संगीत कला आणि चित्रकलेचा सुरेख संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला. तारसप्तकाच्याही पल्याड ज्यांचा सूर पोहोचतो ते स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली आणि वीणा सहस्रबुद्धे यांच्या शिष्या विदुषी सावनी शेंडे या दोनही दिग्गज कलावंतांच्या स्वरांनी संपूर्ण नाट्यमंदिर निनादात होते आणि त्यांच्या विठ्ठल नामाच्या गजरात प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कुंचल्याने देखील त्यांच्या कॅनव्हासवर विठ्ठलाचे रूप अवतरत होते.

मी मुलुंडकर प्रतिष्ठान आयोजित आणि स्वरनिनाद फाउंडेशन प्रस्तुत ‘भक्तीरस’ या कार्यक्रमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणीत या कार्यक्रमाची सुरुवात भरत बलवल्ली यांनी लतादीदींच्या स्वरात गायल्या गेलेल्या ‘ओम नमो जी आद्या’ या ज्ञानेश्वरांच्या ओवीनं केली आणि लतादीदींबद्दलच्या काही आठवणी देखील जागवल्या तसेच त्यांच्या गुरु शिष्य या नात्याची ओळख त्यांनी तिथं करून दिली. ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ या गजरात त्यांनी भक्तीरसाचा वर्षाव रसिकांवर देखील केला. तसेच सुखाचे जे सुख, या पंढरीचे सुख अशा अनेक अभंगांनी नाट्यगृह निनादून टाकले. विदुषी सावनी शेंडे यांनी देखील बोलावा विठ्ठल, आषाढी कार्तिकी विसरू नका मज अशा अभंगांनी नाट्यमंदिर प्रफुल्लित केले. या स्वरांना पं. मकरंद कुंडले ( ऑर्गन ), अमर ओक ( बासरी ), अनय गाडगीळ ( कीबोर्ड ), प्रसाद करंबेळकर ( तबला ), दादा परब ( पखवाज ), मंदार गोगटे ( साईड ह्रिदम ) यांची देखील साथ उत्तमरीत्या लाभली.

या अभंगांच्या ताल-सुरात अच्युत पालव यांच्या कॅनव्हासवर त्यांच्या मनःपटलावरील विठ्ठल साकारत होता. ‘ओम नमो जी आद्या’ प्रार्थनेसह त्यांनी ॐ या अक्षराने विठ्ठलाचे रूप साकारले. त्यानंतर ‘या पंढरीचे सुख पाहता डोळा’ या अभंगावेळी ‘वि’ या विठ्ठलाच्या अद्याक्षरावरून विठ्ठलाचे दर्शन सर्वांना घडवले. अभंगांच्या शब्दांनी कॅनव्हासवर शोभा देखील आणली. त्यांनी रेखाटलेल्या कलाकृतींच्या प्रतिमा या बातमीसह देत आहोत. त्यांच्या या चित्रकलेमुळे कालच्या कार्यक्रमाला चार चांद लागले यात शंकाच नाही !

अशा या दोन्ही कलांचा मेळ अतिशय सुरेखरित्या साधत का कार्यक्रम पार पडला. मंगला खाडिलकर यांच्या सुरेख अशा निरूपणाची साथ या कार्यक्रमाला लाभली. पंढरीची वारी याच कार्यक्रमात घडल्याचा भास या कार्यक्रमात झाला असेल असा हा ‘भक्तीरस’ कला रसिकांना आनंद देऊन गेला.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.