News

चित्र आणि भाष्य, दोन्ही अफलातून !

महाराष्ट्राच्या सद्यःपरिस्थितीवर भाष्य करणारं एक अफलातून व्यंगचित्र सध्या समाजमाध्यमांवर फिरतं आहे. हे व्यंगचित्र अतिशय बोलकं आहे यात शंकाच नाही. ते नुसतंच फिरलं असतं तरी त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला असता, पण सध्या ते फिरतंय ते प्रख्यात चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी त्याच्यावर केलेल्या अप्रतिम भाष्यासह किंवा भाष्यामुळेच.

प्रख्यात व्यंगचित्रकार आलोक यांचं हे व्यंगचित्र आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी व अमित शाह या चार व्यक्तिमत्वांची गुंफण या व्यंगचित्रात घालण्यात आली आहे. आणि या व्यंगचित्रावर चंद्रमोहन कुलकर्णी यांनी त्यातले सूक्ष्म बारकावे समजून देणारं अतिशय संवेदनशील असं भाष्य केलं आहे, त्या भाष्यामुळे खरं तर या व्यंगचित्राकडेच नाही तर अन्य व्यंगचित्राकडे देखील पाहण्याची एक नवी दृष्टी वाचकाला मिळते. इतकं ते भाष्य प्रभावी आहे. चित्रातली रंगसंगती, रेखाटन, व्यक्तिचित्रातील किंवा व्यक्तिमत्वातील नेमकेपणा आणि व्यंगचित्राच्या अवकाशातील हालचाली यांचं विश्लेषण चंद्रमोहन कुलकर्णी यांनी ज्या पद्धतीनं केलं आहे, ते पाहिल्यावर ‘चिन्ह’साठी हा बातमीचा विषय झाला नसता तर ते नवलच ठरलं असतं, नाही का ?

चंद्रमोहन कुलकर्णी म्हणतात,

रिमोट

नव्या मुख्यमंत्र्यांच्या केसांचं वळण, खास शिवसेना शैलीची दाढी आणि टिळा, पांढरे, विशिष्ट पद्धतीचे कपडे, शर्टाची बटणं, पायातले बूट, भांबावलेला चेहरा, उभं राहण्याच्या पद्धतीतनं व्यक्त होत असलेली एन्ट्रीची देहबोली. फडणविसांची देहबोली, त्यांची हेअरस्टाईल, जाकिटावरच्या दोनतीनच लहान रेषा सुचवत असलेला पोटाचा घेर, शिंदेसाहेब आणि फडणविसांच्या देहाच्या आकारमानाचं प्रपोर्शन.

शहासाहेबांचे न चितारलेले आणि मोदीसाहेबांचे चितारलेले ओठ, दोघांचेही न चितारलेले चष्म्याआडचे डोळे; पण केवळ दोन रेषा अन् एकेक ठिपका वापरून चितारलेल्या भिवया (आणि आठ्या!)
शहासाहेबांचे न चितारलेले आणि मोदीसाहेबांचे चितारलेले ओठ, दोघांचेही न चितारलेले चष्म्याआडचे डोळे; पण केवळ दोन रेषा अन् एकेक ठिपका वापरून चितारलेल्या भिवया (आणि आठ्या!)
मोदी आणि शहा या जोडगोळीचं युनिट असल्यासारखं चितारलेलं द्वैत. असे चितारलेत की जन्मतः जोडीनंच उगवून आलेत. दोघांची बसण्याची पद्धतही हे द्वैत व्यक्त करते. गुलाबी, नक्षीदार उच्च प्रतीच्या कोचावर ठाण मांडून पक्के बसलेत. हे आसन डळमळीत नाही , याचीही ग्वाही या रेषा आणि भरगच्च आकार देतात ! शहांनी मोदींच्या खांद्यावर हात ठेवलाय, शेठनी नाही ! या द्वैतातलंही किंचितसं राजकारण हा चित्रकार सुचवतो आहे.
पहिल्या चित्रात, ‘रिमोट माझ्या हाती असेल’ असं शांतपणानं आणि मोठ्या मानभावीपणानं सांगणारे फडणवीससाहेब हे चित्रात, शिंदेसाहेबांपेक्षा आकारानं अर्थातच मोठे दिसतायत. हा मोठा आकार इथे शरीराचा तर आहेच, पण तो वर्चस्वाचाही आहे. रिमोटचा आकारही लहान आहे, कोणत्याही जास्तीच्या रेषांचा वापर न करून हा रिमोट अजून ऑन केलेला नाही हेही सुचवतो.
दुसऱ्या चित्रात, नव्या मंत्रीमहोदयांच्या जोडीच्या दिशेनं जेव्हा शहांचा रिमोट वळतो, तेव्हा त्या नेहमीच ऑन असलेल्या रिमोटच्या पिवळ्या रेषा आपलं काम बजावतात. फडणविसांना धक्का देतात आणि शहांच्या हातातला मोठा, जास्त पॉवरफुल असा केंद्राचा आणि ऑफ कोर्स, प्रभावी असलेला रिमोट फडणविसांच्या हातातला लहान रिमोट उडवून लावतात.

पहिल्या चित्रातल्यापेक्षा फडणविसांचा शिंदेसाहेबांपेक्षा मोठा असलेला आकार या चित्रात लहानही झालेला दिसतो. तो आता शिंदेसाहेबांच्या बरोबरीचा झालाय !

भांबावलेले शिंदे या चित्रात आपल्याला आता आणखीनच भांबावलेले वाटू लागतात. खरं तर शिंदेसाहेबांच्या या दुसऱ्या चित्रात चित्रकारानं यत्किंचितही बदल केलेला नाहीये. बघणाऱ्यांच्या मनातही एक चित्र सुरू असतं, ही गोष्ट हा चित्रकार जाणतो.

आलोक हा भारतातला एक फार महत्वाचा असा चित्रकार आहे. ब्रशच्या जाड रेषांनी आर्टिकलं लिहितो.

राजकारण अशीच वळणं घेत राहो आणि आलोकसारख्या गुणी चित्रकारांची चित्र बघण्याचा वारंवार आनंद मिळत राहो.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.