No products in the cart.
गप्पा सायकलवरुन भारत दर्शनाच्या…
२०१९ सालातली गोष्ट. असाच एप्रिल किंवा मेचा महिना होता. मुंबईच्या एका वृत्तपत्रात चार ओळींचीच बातमी आली होती की, जेजे स्कूल ऑफ आर्टचा एक विद्यार्थी सायकलवरुन भारताच्या प्रवासाला निघणार होता. इतकीच. माझं कुतूहल चाळवलं. त्यात मला स्टोरी दिसत होती. बातमी छापणाऱ्या वृत्तपत्राला ती कशी दिसली नाही याचंही मला आश्चर्य वाटलं.
‘चिन्ह’ आर्ट न्यूज त्यावेळी नुकतंच चालू झालं होतं. स्नेहल बाळापुरे त्या वेळी माझी मदतनीस होती. तिला मी ती बातमी दाखवली आणि शोध घ्यायला सांगितलं.
त्यातून हाती लागला तो प्रतीक जाधव नावाचा धडपड्या तरुण.
प्रतीक तेव्हा जेजेच्या शिल्पकला विभागात शेवटच्या वर्षाला शिकत होता. स्नेहलने त्याच्याशी संपर्क साधला आणि सुरेख लेख लिहिला. तिचाही तो पहिलाच प्रयत्न होता. पण तिनं आजवर केलेली धडपड कामी आली होती.
तिचा तो लेख खूपच गाजला. व्हायरल झाला म्हटलं तरी चालेल. फेसबुकवर देखील त्याला प्रचंड लाईक्स मिळाले. खूपच प्रतिक्रिया आल्या, खूपच कमेंट्स आल्या. ‘कोण हा प्रतीक ?’ अशी विचारणा होऊ लागली. सारे जण त्याचा
फोन नंबर मागू लागले. तेव्हाचा तो लेख काल पुन्हा एकदा आम्ही प्रकाशित केला आहे. अजूनही वाचला नसेल तर जरुर वाचा.
मदतीचे असंख्य हात पुढे आले. कुणी कुणी काय काय देऊ लागले याची गणतीच राहिली नाही. काही काळ त्या उत्साहाला आवर देखील घालावा लागला. कुणी त्याला कपडे दिले, कुणी शूज, कुणी बॅग. एकानं तर त्याला महागडी सायकल दिली. आर्थिक साहाय्य करणारे तर सारेच होते.
अशा तऱ्हेनं जेजेमधूनच त्याच्या कला प्रवासाला आरंभ झाला. हळू हळू त्यानं आपलं लिखाण चिन्ह’ला पाठवायला सुरुवात केली. त्यालाही वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. निम्याहून अधिक यात्रा पूर्ण झाली असताना अचानक कोरोना लॉकडाउन सुरु झाला आणि त्याला यात्रा थांबवावी लागली. त्यावेळी तो पश्चिम बंगालमध्ये होता. तिथून तो मुंबईला परतला. गच्चीवरील गप्पांमध्ये सहभागी देखील झाला.
तब्बल दोन वर्षानंतर त्याची यात्रा पुन्हा सुरु झाली. आणि येत्या ५ व ६ तारखेला ती तो संपवणार आहे. जिथनं त्यानं यात्रा सुरु केली होती. त्या जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये तो आपल्या यात्रेचा शेवट करणार आहे.
गेल्या आठवड्यात त्याचा अचानक फोन आला, म्हणाला- सर, यात्रा संपत आली आहे. जेजेमध्ये शेवट करतो आहे त्या आधी ठाण्यातून जाणार आहे. तुम्हाला भेटायचं म्हणतोय ! मी त्याला लागलीच परवानगी दिली. आणि ५ तारखेलाच ‘चिन्ह’चा यु ट्यूब चॅनेल, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर प्रतीक सोबतच्या लाईव्ह गप्पांच्या कार्यक्रमाची घोषणा देखील केली.
५ एप्रिल च्या संध्याकाळी ५.०० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. संपूर्णपणे नवीन टीमच्या हातात ह्या कार्यक्रमाची सूत्रं दिली आहेत. ‘गच्चीवरील गप्पां’च्या बहुतांशी कार्यक्रमात जिनं मला साथ दिली ती गीता कुलकर्णी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. तिच्या सोबत प्रश्न विचारण्याची कामगिरी ‘चिन्ह’ आर्ट न्यूजची कार्यकारी संपादक कनक वाईकर पार पाडणार आहे. आणि ‘कमी तिथं आम्ही’ या न्यायानं मी या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
गेल्या चार पाच वर्षामध्ये प्रतीकला आलेले अनुभव भन्नाट आहेत. ते सारेच या कार्यक्रमात येणं शक्य नाही. पण हा कार्यक्रम जास्तीत जास्त चांगला व्हावा यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. एवढंच सांगेन की हा कार्यक्रम पाहायला विसरु नका.
****
– सतीश नाईक
संपादक, ‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion