News

‘ ड्रीम स्केप्स ‘: मिलिंद फडके यांचे चित्र प्रदर्शन

चित्रकार मिलिंद फडके यांच्या चित्रांचे प्रदर्शन दि १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनानिमित्त फडके यांनी आपली चित्रभाषा आणि चित्रांविषयीचे मनोगत या लेखातून मांडले आहे. मिलिंद फडके प्रामुख्याने निसर्गचित्रे काढतात. त्यामुळे त्यांची स्वप्ने आणि निसर्गचित्रे यांचा संगम साधणारी त्यांची चित्रे अर्थात ‘ड्रीम स्केप्स’ आहेत.

धकाधकीच्या जीवनापासून अधूनमधून निसर्गाच्या सान्निध्यात जायला आपण आसुसलेले असतो. निसर्गाची विविध रूपं आपल्याला साद घालत असतात. रसिकांच्या भावभावना निसर्गातील रंग, रूप, आकार, वातावरण, छायाप्रकाश यांच्या दृश्य परिणामांना प्रतिसाद देत असतं. चित्रकारांच्या सृजनशील मनात निसर्गाच्या अशा विविध रुपांचे विभ्रम प्रकट होत राहतात. चित्रकारांची एक स्वप्नसृष्टीच तयार होते … जी त्यांच्या चित्रकृतींतून आकाराला येते प्रत्येक चित्रकाराच्या मनाचा , प्रतिभेचा, विचारांचा, जीवनाचा, अभिव्यक्तीचा भवताल वेगवेगळा असतो व त्या त्या चित्रकाराच्या शैलीतून व्यक्त होत असतो.

आपण सर्वच जण स्वप्नं पहात असलो तरी, चित्रकार अधिक स्वप्न पहातात कदाचित आकार, रंग, रूपरेषा, पोत यांची स्वप्ने पाहिलेल्या न पाहिलेल्या … अनुभवलेल्या न अनुभवलेल्या व्यक्ती, वस्तु , जागा , दृश्ये यांची स्वप्ने चित्रविचित्र कल्पनांची स्वप्ने दिसतात. चित्रकलेच्या परिभाषेत वास्तववादी , अप्रतिरूप , अमूर्त … अतिवास्तववादी स्वप्ने डोळ्यासमोर येतात. जशी दृष्टी तशी सृष्टी … मी निसर्गचित्रकार असल्याने माझी स्वप्ने निसर्गाची असावीत निसर्गाच्या अनंत, अविरत सृजनक्रियेतून, दिवस रात्रीच्या नाट्यातून अनंत प्रतिमा, अनंत दृश्ये दिसत रहातात, अनुभवता येतात. सतत प्रेरणा मिळत असते त्यातून.

संधिप्रकाशात प्रकाशांची आणि छाया यांची नाटयमयता अधिक प्रतीत होते .. अनुभवता येते. ढगांच्या मागून एखाद्या क्षणार्धात प्रकटणारे सूर्यकिरण सर्व सृष्टी उजळून टाकतात तर कधी पुढे पुढे धावणाऱ्या ढगांची दाटी अवचितपणे सर्व आकार झाकोळून टाकतात … मनाला हुरहुर लावणारा हा संधिप्रकाश निसर्गाला करडया , ग्रे रंगछटांनी माखून टाकतो. पण कदाचित कवी, चित्रकार व रसिक जनांना हा काल सुंदर , काव्यात्मक व प्रणयरम्य भासतो . मलाही खूप आवडतो हा संधिप्रकाश .

झाडाझुडपांतून आणि त्यांच्या छायेतून चमचमणारे लखलखणारे काजवे दिपावलीचे दृष्य डोळ्यासमोर साकारतात . त्या ‘ दिव्यांची उघडझाप आपण स्तिमित होऊन पहातच रहातो ! जशी जशी रात्र काळोखी धारण करते तसे प्रकाशाचे झोत आणि चमकणारे दिवे गूढ भासू लागतात . हितगुज करणारी पानांची सळसळ आपल्याला एखाद्या रहस्यकथेमध्ये घेऊन जाते. ढगांची आपापसात चाललेली कुजबुज … झाडांच्या शेंडयावर आणि डोंगरांच्या कड्यांना स्पर्शन जातांना चाललेले संवाद ऐकू येऊ लागतात … ओबडधोबड आणि गुळगुळीत दगडगोरे आणि कडेकपारीतून वहाणारा शीळ घालणारा वारा एखादे अंगाई गीत गात गात आपल्याला निद्रेच्या स्वाधिन करतो … पुन्हा स्वप्नमयी अवस्थेत आणून सोडतो.

माझ्या निसर्गचित्रांबद्दल मनोगत व्यक्त करतांना , माझ्या मनातील स्वप्नचित्रे कशी साकारतात हे मला उलगडून दाखवायचं होतं . माझ्या माध्यमातून चित्रसौंदर्याचा शोध घेताना , रसिकांनाही त्यात सामावून घेण्याचा आणि आनंद देण्याचा माझा प्रयत्न असतो . मनातील कल्पनांचे चित्रकृतीत आविष्करण होत असतांना , चित्र हळुहळु फुलत जाते , बहरत जाते . कोणाला ही चित्रे प्रतिरूप वाटतील , कोणाला त्यांच्यात अप्रतिरुपाचा परस्पर्श झाल्यासारखे वाटेल , तर कुणाला यात शैलीचा अभिनिवेश अधिक भासेल .

जहांगीर आर्ट गॅलरी , मुंबई येथे , १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२२ या काळात संपन्न होणाऱ्या माझ्या एकल प्रदर्शनात रसिकांनाही आनंद मिळावा अशी मला आशा आहे .

प्रदर्शनाचा पत्ता:
जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, फोर्ट, मुंबई – ४०० ००१
प्रदर्शनाची वेळ : सकाळी ११ ते संध्याकाळी ७

*****
– मिलिंद फडके

 

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.