News

महाराष्ट्राच्या दृश्यकलेचा परामर्श

एन्सायक्लोपीडिया व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र हा ग्रंथ पंडोल आर्ट गॅलरीने प्रकाशित केला आहे. महाराष्ट्रातील कला इतिहासाचा हा महत्वपूर्ण दस्तऐवज असून  ‘An invaluable reference source for students, artist, scholars and art lovers’ या टॅगलाईनला सार्थ करणारा हा ग्रंथ आहे. संपादकीय टीमच्या अथक प्रयत्नानंतर हा कोश तयार झाला. अठराव्या शतकापासून एकविसाव्या शतकापर्यंतच्या ( prehistoric to modern era ) 307 कलाकारांचा तसेच चार महत्त्वपूर्ण कलासंस्थांचा मागोवा घेण्याचे अत्यंत जिकिरीचे काम कोशाच्या संपूर्ण चमूने अतिशय परिश्रमपूर्वक, जिद्दीने आणि चिकाटीने पूर्ण केले आहे. खरं तर कोश म्हटलं की तिथे संदिग्धतेला जागाच नसते. आणि त्यामुळेच हा कोश वाचकांच्या अपेक्षांच्या कसोटीवर उत्तीर्ण होतो. या कोशात नेमकं काय आहे त्याचा परिचय करून दिला आहे प्रा. सुरेखा दंडारे वसेकर यांनी त्यांच्या लेखात.

या कोशातील  ‘An invaluable reference source for students ,artist, scholars and art lovers’हे वाक्य माझ्या मनात घर करून बसलं. खरंतर तेव्हापासूनच या चरित्रकोशाबद्दल लिहावे असे अगदी मनोमन वाटत होते.मात्र काय व कसे लिहावे , सुरुवात कशी करावी हा मोठाच प्रश्न माझ्यासमोर होता,कारण त्याचा आवाका फार मोठा आहे. अगदी कोश हातात घेताक्षणीच त्याचे मुखपृष्ठ ,आतील मांडणी व आशय, पब्लिशर नोट ,एडिटर नोट , प्रीफेस या बाबी सुस्पष्ट आहेत.कोश म्हटलं की त्यात संदिग्धतेला थाराच नसतो. आणि या निकषाला हा कोश खरा उतरला आहे.

अठराव्या शतकापासून 21 व्या शतकापर्यंतच्या ( pre historic to modern era ) 307 कलाकारांचा तसेच चार महत्त्वपूर्ण कलासंस्थांचा मागोवा घेण्याचे अत्यंत जिकिरीचे काम कोशाच्या संपूर्ण चमुने अतिशय परिश्रमपूर्वक, जिद्दीने आणि चिकाटीने पूर्ण केले आहे, याची प्रचिती कोश बघतांना आणि वाचतांना पदोपदी येते. या  चरित्रकोशासाठी कलाकारांची निवड करणे हे एक मोठे आव्हानच होते. मात्र एडिटर आणि कमिटीतील एक्सपर्ट्सनी ठरवलेल्या ‘criteria for the selection of artist’ तसेच selection process वाचकांसमोर ठेवल्यामुळे त्यांच्यासाठी ते उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरते. इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडानुसार चित्रकारांनी काढलेली चित्रं बघत असताना काळानुरूप त्यात होणारे बदल, बदललेले विषय आणि माध्यम यांचा परिचय होत गेला.

कोशाचा आकार, अंतर्गत सजावट , मांडणी , ब्लॅक अँड व्हाईट तसेच रंगीत छपाई अत्युत्कृष्टच. कोशाचे दोन विभाग केले आहेत. पेंटिंग, स्कल्प्चर व अप्लाईड आर्ट. असे करण्यामागील उद्देश, कारणमीमांसा अतिशय समर्पकपणे त्यात देण्यात आली आहे . संपूर्ण महाराष्ट्रातील कलाकारांची सूची तयार करणे, कलाकारांच्या कार्याची योग्य दखल घेणे आणि पुढील पिढ्यांनाही त्यांची व त्यांच्या कार्याची ओळख करून देण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य या कोशाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने करण्यात आले आहे त्याला तोड नाही. या कोशाच्या निमित्ताने चित्रकलेच्या इतिहासात मौलिक भर घातली आहे.

माझे वडील कलामहर्षी त्र्यंबक वसेकर यांनी मराठवाडा व महाराष्ट्रात केलेले कार्य या इंग्रजी आवृत्तीमुळे जागतिक पातळीवर पोहोचेल याचा व्यक्तिशः मला तसेच संपूर्ण परिवाराला आनंद होत आहे. तसा या कोशात ज्यांच्या परिवारातील व्यक्तीची, त्यांच्या दृश्यकला क्षेत्रातील कार्याची नोंद घेतली गेली आहे त्या सर्वांसाठीच हा ‘अभिमानबिंदू’आहे. संपूर्ण संपादक मंडळ , प्रकाशक दादिबा पंडोल , विशेषतः पंडोल परिवाराची कलाक्षेत्रात योगदान देण्याची परंपरा पुढील पिढ्यांनी अखंड सुरू ठेवली आहे त्याबद्दल त्यांची तसेच चरित्रकोश निर्मिती प्रक्रियेतील विविध जबाबदाऱ्या बेमालूमपणे पूर्ण करणारी संपूर्ण टीम, या सर्वांनी हा कोश चित्रकार, कलाकार, रसिकजनांना बहाल केला आहे, त्यासाठी कलाजगत कृतज्ञ आहे .

असे म्हटले जाते की कला ही समाजमनाचा आरसा आहे. अधिक व्यापक अर्थाने सांगायचे झाल्यास ‘ कला ही संस्कृतीचे दर्पण व राष्ट्राची भूषण आहे ‘ असे म्हटले जाते. कोणत्याही समाजाचा , देशाचा इतिहास अभ्यासायचा झाल्यास कोणत्या कालखंडात त्या समाजात कलेचा विकास झाला त्याच्याशीही जोडला गेलेला असतो. ज्या कालखंडात कला साहित्य यांचा अधिक विकास होतो तो कालखंड अधिक समृद्ध व भरभराटीचा मानला जातो. दुर्दैवाने आज कला विश्वाकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही (त्यातही दृश्यकलेच्या संदर्भात) असा मनोग्रह निर्माण होत असतानाच हा कोश हाती आला. चित्रकार ,कलाक्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व घटकांना तो नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. यातून दृश्यकलाक्षेत्रात एक चळवळ उभारण्याचे स्फुल्लिंग चित्रकारांच्या मनात रुजो हीच सदिच्छा!

इनसायक्लोपीडिया, व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र हा आपल्या देशात अशा पद्धतीचा झालेला पहिलाच प्रकल्प असून महाराष्ट्राच्या कलापरंपरेचा आढावा त्यात घेण्यात आला आहे. मुख्यत्वे हा महाराष्ट्रातील चित्रशिल्पकार व उपयोजित कलाकारांचा चरित्रकोश असला तरी त्यात इतरही अनेक गोष्टी आहेत. या कोशाची प्रस्तावना म्हणजे महाराष्ट्राचा प्रागैतेहासिक काळ ते अगदी आत्तापर्यंत कलाविषयक झालेल्या स्थित्यंतराचा, इतिहासाचा मागोवा आहे. या पद्धतीने महाराष्ट्राच्या कलेचा आढावा प्रथमच घेण्यात आलेला आहे. आपण आधी पाहिलं त्याप्रमाणे या कोशाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे ३०७ चित्रशिल्पकार व उपयोजित कलाकारांच्या सविस्तर नोंदी.

या नोंदी करताना त्या कलावंतांच्या जीवनासह त्यांच्या कलात्मक कामगिरीचा आढावा त्यात घेण्यात आलेला आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कोशात महाराष्ट्राच्या कलेसंदर्भात ज्या चार संस्थांनी महत्त्वाची कामगिरी बजावली त्यांची माहिती प्रथमच येत आहे. या संस्था म्हणजे सर जेजे स्कूल ऑफ आर्ट, बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि आर्टिस्ट सेंटर. याशिवाय या कोशात काही ठिकाणी कलाविषयक वाटचालीत घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची नोंद घेण्यात आली असून त्या घटना कालक्रमानुसार योजलेल्या आहेत. एन्सायक्लोपीडिया, व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र हा कोश अनुभवतांना आपल्या राज्यातील आणि बॉम्बे स्कूल कलापरंपरेतील महत्त्वाच्या सर्वच चित्रशिल्पकारांचा, उपयोजित कलाकारांचा परिचय होतो आणि त्यात अज्ञात असलेलेही कलावंत लक्षात येतात हे विशेष. एकूणच हा कोश आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाला आहे असेच म्हणावे लागेल. चरित्रकोशाच्या सुरुवातीलाच James Courins यांचे जे विधान घेतले आहे ते खूपच बोलके आणि वास्तव आहे ते येथे उद्घृत करत आहे. “It is in the artistic records, much more than in the records of wars and dynastic changes that a Nation’s thrue history is to be found.”  सर्व कलाप्रेमी, कलाकार व कलारसिकांनी, कलासंस्थांनी संग्रही ठेवावा असाच हा कोश आहे.

– प्रा.सुरेखा दंडारे – वसेकर, औरंगाबाद          

 email ID: rekhraj9@gmail.com

हे पुस्तक खरेदी करण्यासाठी अमेझॉन लिंक पुढीलप्रमाणे आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.