News

इंडिया आर्ट फेअर : काही चांगलं बरचसं वांगलं

दिल्ली येथे सध्या इंडिया आर्ट फेअर सुरू आहे. भारतीय दृश्यकला क्षेत्रातील हा एक महत्वाचा इव्हेंट. चित्रकार पिसुर्वो अर्थात जितेंद्र सुरळकर यांनी दिल्ली आर्ट फेअरला भेट दिली. ( पिसुर्वोचं वैशिष्टयं म्हणजे ते कुठलंही प्रदर्शन चुकवत नाहीत.) इंडिया आर्ट फेअरला मिळणारा प्रतिसाद आणि यंदाच्या आयोजनाबद्दल पिसुर्वो यांच्याशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या माहिती आणि फोटोमधून इंडिया आर्ट फेअरचा हा वृत्तांत.

यंदाच्या इंडिया आर्ट फेअरचं वैशिष्टयं म्हणजे कोरोनानंतर कलाक्षेत्र जरासं स्थिरस्थावर झाल्याने मिळालेला उत्तम प्रतिसाद. तरुणाईने तिकीट काढून या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात भेट दिली. वेगवेगळ्या गॅलरीजनी मोठ्या प्रमाणात तरुण कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित केल्या. मुंबईच्या विक्रांत भिसेचं कामही इथे प्रदर्शित झालं. दलित विचार आणि अभिव्यक्तीला मोठ्या प्रमाणात इथे जागा मिळाली हा एक सकारात्मक अनुभव होता.

बरचसं चांगलं होतं. इंडिया आर्ट फेअरमध्ये वैयक्तिक कलाकार सहभागी होऊ शकत नाही आणि गॅलरीच कलाकाराला प्रदर्शित करते. गॅलरीच्या उत्तम व्यवस्थापनामुळे कलाकृतींची खरेदीविक्री मोठ्या प्रमाणात झाली. पण खटकणारी गोष्ट म्हणजे गॅलरीज कुठल्याही कलाकृतीच्या विक्रीमधील 50 टक्के हिस्सा स्वतःकडे घेतात. याचा ताण कलाकारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. जे प्रस्थापित आहेत त्यांना याने काही फरक पडत नाही; पण हे नवोदित चित्रकारांच्या बाबतीत जाणवत होतं.


अनेक गॅलरीज केवळ कलाकृतींचं प्रदर्शन करतात. कलाकारांच्या चित्र विक्रीसाठी ते विशेष प्रयत्न करत नाहीत. शिवाय अनेक भेट देणारे जे कलाकार होते त्यांचा गॅलरीजशी संपर्क करण्याचा प्रयत्न होता. पण गॅलरीजचा प्रतिसाद अतिशय थंड आणि नकारात्मक होता.

या फेअरमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली नवोदित कलाकारांनी चित्र प्रदर्शनासाठी पारंपरिक पद्धतीना फाटा देऊन नवीन कार्यपद्धती आखणे गरजेचे आहे. सध्या सोशल मीडिया सारखे अस्त्र आपल्या हातात आहे. तिथे तुमचं अस्तित्व तयार करा. गॅलरीजची संख्या मर्यादित आहे ती एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या चित्रकारांना सामावून घेऊ शकत नाहीत. शिवाय त्यांचं स्वतःचं आर्थिक गणित आणि राजकारण असतं त्यामुळे बऱ्याच जणांच्या हाती निराशाच येते. त्यामुळे आपल्या स्थानिक क्षेत्रात आपला प्रेझेन्स वाढवा. मी स्वतः मोठ्या गॅलरीज मागे न लागता माझ्या गावी जळगाव येथे प्रदर्शनं केली. सोशल मिडियाचा वापर केला. मला मिळणारा प्रतिसाद उत्तम आहे.

अजून एक गोष्ट म्हणजे मराठी चित्रकार इंग्रजी संभाषणात कमी पडत आहेत त्यामुळे त्यांना काहीसं डावललं जात असे माझं मत आहे. अनेक कला रसिक तिथे प्रदर्शित झालेल्या चित्रकारांशी संवाद साधण्याची प्रयत्न करत होते पण त्यांचा प्रतिसाद शून्य होता. त्यामुळे इंडिया आर्ट फेअरने चित्रकारांना थोडस सॉफ्ट स्किलचंही प्रशिक्षण द्यावं. येणारा तिकीट काढून प्रदर्शनं बघतोय त्यामुळे त्याला निदान सन्मानाची वागणूक चित्रकारांनी देणं अपेक्षित आहे.

मला इंडिया आर्ट फेअरचं तिकीट विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महाग वाटतं. त्यामुळे मी अस सुचवेन की कला विद्यार्थ्यांना फेअरने स्वस्तात तरी तिकीट द्यावं किंवा मोफत प्रवेश दयावा. कलाकारांना संधी देणारे हे एक महत्वाचे प्रदर्शन आहे. त्यामुळे आयोजकांनी ग्रामीण भागातून येणाऱ्या कलाकरांना संधी आणि प्रतिसाद द्यावा नाहीतर हा केवळ प्रस्थापितांच्या सोहळा बनून राहील हे निश्चित.

****

शब्दांकन : कनक वाईकर

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.